जागतिक पर्यावरण दिन विशेष : झाड ‘स्थानिक’च हवे!

जागतिक पर्यावरण दिन विशेष  :  झाड ‘स्थानिक’च हवे!

पूजा कोठुळे,क्षेत्र अधिकारी, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक

वृक्षवल्ली आम्हा सोयरी! या वाक्यात किती अर्थ दडलेला आहे, यावरूनच लक्षात येते की वृक्ष हे आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचे आहेत. संपूर्ण जगाचा विचार केला तर मानव जे अन्न खाऊन जगतो त्याचा स्रोतच मुळात झाड आहे. जेवढे वृक्ष आपल्या आजूबाजूला असतील तेवढे वातावरण थंड राहते, वातावरणातील उष्णता कमी करण्याचे काम झाडांमुळे होते. म्हणून झाडांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

आज जग भौतिक सुखाच्या मागे लागले आहे, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वृक्ष तोडून इमारती उभ्या राहत आहेत. घनदाट जंगल हळूहळू नष्ट होत आहेत. एका झाडाचा विचार आपण केला तर 500 लोकांना एकावेळी पुरेल एवढा प्राणवायू रोज आपल्याला फुकट मिळतो. या प्राणवायूची किंमत आपल्याला करोना महामारीमुळे समजली आहे. याची जाणीव म्हणून एक तरी झाड एक माणसाने लावले आणि त्याला जपले पाहिजे. परंतु ते झाड स्थानिक झाडच असायला हवे.

आपण कोणती झाडे आणि कुठे लावली पाहिजे या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे.जसे की, ज्या ठिकाणी झाडे लावायची आहेत त्या जागेवर ते झाड जगेल का? कारण बर्‍याचदा लोक एखादी पडीक जागा समजून गवताळ माळरानावर झाडे लावतात. परंतु हे चुकीचे आहे. मुळात गवताळ प्रदेशात झाडे लावली तर ती झाडे जगण्याच्या संधी कमी असतात. कारण तो अधिवास झाडांसाठी पोषक नसतो. आपण अशा गवताळ प्रदेशात झाडे लावून त्यांचा मूळ अधिवास नष्ट करतोे. म्हणूनच झाडे लावायच्या आधी ज्या ठिकाणी झाडे लावणार आहोत त्या जागेचा नीट अभ्यास करायला हवा.

आपण लावतो ती कोणती झाडे आहेत, ती लावून उपयोग होणार आहे का, हे देखील बघितले पाहिजे. याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर, गेल्या काही वर्षांपूर्वी वृक्षारोपण या उपक्रमातंर्गत गिरीपुष्प म्हणजेच ॠश्रळीळवळलळर या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली. मुळात हे झाड भारतीय नाही. या झाडांमुळे त्या ठिकाणी असलेली माती अ‍ॅसिडिक होते. हे झाड ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी इतर दुसरी झाडे उगवत नाहीत. या झाडांमुळे विषारी वायू उत्सर्जित केला जातो. त्यामुळे या झाडाची फुले जर उंदीर किंवा घुस यांनी खाल्ली तर त्यांचा मृत्यू होतो. म्हणूनच या झाडाला उंदिरमार असे देखील संबोधले जाते.

हे झाड खूप लवकर वाढते आणि हिरवे दिसते म्हणूनच या झाडाबद्दल इतर काही माहिती न घेता अनेक मोकळ्या जागांवर याची लागवड करण्यात आली.मादागास्करमधून भारतात आलेल्या गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ, अक्याशीया, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकर जागेवर डेरा जमवून आपल्या अ‍ॅसिडिक गुणधर्मामुळे आसपासची जमीन नापीक केली आहे. या विदेशी झाडांवर किटके, पक्षी सुद्धा येत नाहीत. झाडांच्या मुळांनी पाणी शोषून घेतल्यामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे जमिनी निकृष्ट झाल्या आहेत. या झाडांमुळे निसर्ग साखळी कमकुवत होत आहे निव्वळ शोभेसाठी या झाडांची लागवड करणे कितपत योग्य आहे? ज्याचा उपयोग ना आपल्याला होतो ना पर्यवरणाला.

या उलट स्थानिक वृक्षांमुळे अनेक फायदे होतात. जसे, वड, पिंपळ, करंज, उंबर, बकुळ, सिताअशोक, शिरीष, कांचन, साग, कडूलिंब, चिंच, आवळा, कवठ, बेल, जांभूळ, बहावा, आंबा, फणस, कदंब, पळस, सीताफळ, इ. देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा आपल्या परिसरात पर्यावरणाचा समतोल राखतात. देशी झाडांच्या गळलेल्या पानांपासून खत तयार होते आणि यामुळे जमिनीचा कस वाढतो. किड्यांना, सरपटणार्‍या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते. ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडांमध्ये आहे.

देशी झाडांमुळे वातावरणात प्राणवायू चे प्रमाण अधिक वाढते आणि मानवी शरीरासाठी घातक आलेला कार्बन डाय आक्साइड वायू पर्यावरणातून शोषून घेऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम करतात. स्थानिक वृक्षांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांसाठी निवारा बनतात. अशी ही स्थानिक झाडे जैवविविधता पूरक असतात. याचा अर्थ असा की बहुतेक वन्यजीव या झाडांभोवती आढळतात. देशी झाडांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. या झाडांमुळे माती सुपीक राहण्यास मदत होते. स्थानिक झाडे अन्न साखळी मजबूत करतात. अनेक पक्षी या झाडांच्या बिया निसर्गात पसरवण्याचे काम करतात. म्हणून आपल्या परिसरात अशा स्थानिक झाडांची लागवड व्हायला हवी. निव्वळ फोटोसाठी चुकीचे वृक्षारोपण करणार्‍यांना आता थांबवणे गरजेचे आह. अन्यथा फक्त हिरवळ दिसेल परंतु जैवविविधता कोठेही दिसणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com