जागतिक पर्यावरण दिन विशेष : पक्ष्यांचा ‘आकाशी’ दृष्टिकोन!

जागतिक पर्यावरण दिन विशेष : पक्ष्यांचा ‘आकाशी’ दृष्टिकोन!

शुभांगी दंताळे

आपल्याला फार आनंद झाला की, पंख लावून आकाशात उडावसे वाटते. ते का? तर पक्ष्यांची दुनिया ही फार निराळी असते. अनेक रंग, आवाज, हरकतींनी भरलेले हे एक अद्भुत जग आहे. या जगाचे केंद्र असलेल्या पक्ष्यांकडे कटाक्षाने लक्ष देवून पहायला हवे. अंडे, पिल्ले, मग मोठे पक्षी ( Birds )ही त्यांची जीवन प्रक्रिया. फक्त यात प्रत्येक पक्ष्याच्या कालावधीत फरक असतो. एकाच प्रजातीत अनेक उपप्रजाती असतात. पोषक अशा विशिष्ट वातावरणातच ते आढळतात. काहींची खाद्ये वेगवेगळी असतात. पक्ष्यांचे पाय, मान, अंग, पंख, चोच त्यांच्या राहणीमानावर अवलंबून असतात. यावरून पक्षी निरीक्षण करणे ही सोपे होते.

पक्षी हे पर्यावरणाला (environment)मोठे योगदान देतात. न हलणार्‍या झाडांचे परागीभवन करत, वनांची वृद्धी करण्यात त्यांची मदत होते. सजीव सृष्टीचे संतुलन कायम ठेवण्यास गिधाड, कावळा व बदक यांसारख्या पक्ष्यांचा हातभार लागतो. हिंस्र श्वापदे, प्राकृतिक, भौगोलिक, नैसर्गिक बदल, पावसाचे संकेतही ते देतात. कधी दिशादर्शक ठरत तर कधी निसर्गातील विविध प्रकारच्या कीटक, बिळातील जीव व सरपटणार्‍या जीवांवर जैविक ताबा ठेवत निसर्ग संवर्धन पक्षी करतात.

पक्षी, वृक्ष, वन्यजीव हे जैव विविधतेचे प्रमुख घटक आहेत. या प्रत्येक घटकाच्या सहाय्याने पृथ्वीवरील सजीव सृष्टी विकसित होते. जैव विविधतेचा प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो. पक्ष्यांची प्रमुख निवासस्थाने म्हणजे वन, गवताळ प्रदेश आणि पाणथळ. नाशिक शहरात या तीनही गटांतील पक्षी दिसतात. अनेक पक्षी अनुकूल वातावरण शोधत भ्रमण करतात. यांना स्थलांतरित पक्षी म्हणतात. युरोप, आफ्रिका इत्यादी ठिकाणांहून येणारे निरनिराळे पक्षी त्यांच्या हवामान गरजेनुसार नाशिकमध्ये वास्तव्यास येतात. ज्यात शाही चक्रवाक, थापट्या बदक, पट्टकादंब, काळ्या मानेची टिबुकली, छोटा व मोठा रोहित, काळ्या डोक्याचा कुरव इत्यादी पक्षी आढळून येतात.

नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षी निरीक्षण करण्याजोगी ठिकाणे म्हणजे हरसुल, पेठ, इगतपुरी, बार्‍हे येथील वनक्षेत्रे, येवला, नांदगाव, चांदवड, वणी व राजापूर-ममदापूर येथील गवतीमाळ प्रदेश, गंगापूर, नांदूर-मध्यमेश्वर हे रामसर क्षेत्र, वाघाड, दारणा व ओझरखेडची पाणस्थळे, तसेच अंजनेरी, ममदापूर आणि भोरकडा (बोरगड) ची सौंदर्यपूर्ण संरक्षित संवर्धन राखीव स्थाने. यांपैकी गंगापूर हे आंतरराष्ट्रीय स्थलांतरणाच्या मार्गावर येत असल्याने अनेक पक्षी तिथे पहायला मिळतात. म्हणून त्या परिसराला आय.बी.ए (खइ- - खािेीींरपीं इळीव -रीशर) म्हणून घोषित केले तर नांदूर मध्यमेश्वर हे एक रामसर स्थान आहे. बोरगड हे महाराष्ट्रातील पहिले संवर्धन राखीव स्थान आहे. येथे नाशिकमध्ये दिसून येणार्‍या 350 प्रजातींपैकी 122 प्रजाती आहेत.

पक्षी संवर्धनासाठी आपण पक्षी ओळखण्याव्यतिरीक्त स्थानिक झाडांची लागवड करून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, त्यांची शिकार रोखणे, त्यांच्या विविध अंगांसाठी तस्करी रोखणे व पक्षी न पाळता त्यांना जास्तीत जास्त मोकळ्या वातावरणात ठेवणे गरजेचे आहे. पक्षी बघायला मोठ्या जंगलात जाणे गरजेचे आहे असे अजिबात नाही. आपल्या सभोवती अनेक पक्ष्यांचा निवास असतो. शहरी पक्षी हे लपता येण्यासारख्या रंगांचे असतात. शहरी पक्षी मानव-निसर्ग संबंधाला टिकवण्यात मोलाचे काम करतात. पक्षी निरीक्षण ही एक मजेदार कला आहे. विविध पक्ष्यांचे आवाज, हाल-चाल, रंग, त्यांचे अवयव, निवासस्थाने यांचा निरीक्षणाद्वारे अभ्यास करत पर्यावरणाचा अभ्यास म्हणजे जैवविविधतेकडे बघायचा आकाशी दृष्टिकोन!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com