
सातपूर | प्रतिनिधी | Satpur
बालकामगार सुधारणा अधिनियमातील तरतुदीनुसार बालकामगारांना कामावर ठेवणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बालकामगार आढळल्यास त्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कामगार उपायुक्त विकास माळी यांनी दिली...
जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधत कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत 12 ते 18 जून दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात ते बोलत होते.
बालकामगारांची मालकाच्या छळातून मुक्तता करून पोलीस ठाण्यात संबंधित आस्थापनेच्या मालकाविरुद्ध कारवाई होऊन अटक होऊ शकते. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास १ ते ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.
तसेच 10 हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षेचे प्रावधान आहे. १४ ते १८ वयोगटातील बालकामगारांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेतील आस्थापनेत कामावर ठेवणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. नागरिकांनीदेखील जागरूकता बाळगून असे कामगार आढळल्यास कामगार उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त माळी यांनी केले आहे.
वेबिनारद्वारे प्रबोधन
कामगार उपायुक्त कार्यालयाकडून वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बालकामगार अधिनियमातील तरतुदीबाबत चर्चासत्र घेतले जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटनांची वेबिनारद्वारे बैठक घेउन बालकांना कामावर न ठेवण्याबाबत सामुदायिक शपथ देऊन हमीपत्र घेण्यात येणार आहे.
सप्ताहातील उपक्रम
बसस्थानक येथे बालकामगार विरोधी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्याभरातील आस्थापनांना भेट देत बालकामगार विरोधाबाबत माहिती देऊन आस्थापनांच्या ठिकाणी बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत स्टिकर्स लावण्यात येणार आहे. पत्रक वाटप, कामगार विभागातील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक बालकामगार धाडसत्र मोहीम राबवण्यात येईल. वीटभट्टी, खडीक्रशर, हॉटेल, दुकाने, चहा टपरी, गॅरेजची तपासणी करण्यात येईल. हॉटेल असोसिएशन, दुकाने व व्यापारी असोसिएशनद्वारेदेखील याबाबत प्रबोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे.