
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, नाशिकमधील थिएटर वर्कर्स आणि इप्टाच्या वतीने विद्यापीठात ’थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड’ (Theater of the Oppressed) या पाच दिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक प्रा. डॉ. जयदीप निकम यांच्या हस्ते झाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासनचे (Dr. Babasaheb Ambedkar Adhyasan) प्रमुख नागार्जुन वाडेकर, थिएटर वर्कर्सचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, इप्टा नाशिकच्या मुक्ता कावळे व प्रशिक्षक संकेत सीमा विश्वास, प्रियपाल दशांती आणि समीर तभाने याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध शहरांतील 30 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.
ऑगस्तो बोअल (Augusto Boal) या ब्राझिलियन नाटककाराने 1960 च्या दशकात थिएटर ऑफ दि ऑप्रेस्ड ह्या नाट्यप्रकाराची निर्मिती केली. यातून विविध घटकांवर होणार्या अन्यायाबाबत विचार करण्यास प्रवृत्त केले जाते. हा एक रस्ता नाट्याचाच प्रकार आहे, परंतु ह्यात नट फक्त नाटक सादर करत नाहीत तर प्रेक्षक सुद्धा ह्या नाटकात सहभागी होतात.
नाटक समाजापुढे प्रश्न उभे करते, त्यांना त्यांच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते. अशाप्रकारे समाजात न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधूता ही संविधानिक मूल्ये रूजविण्याचे काम करते. याबद्दल माहिती देण्याकरिता, कार्यशाळेचे आयोजन केले आहे. नागार्जुन वाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.