
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्हा परिषद नाशिकच्या (Zilla Parishad Nashik ) पथदर्शी सुपर 50 उपक्रमात (Super-50 Campaign ) निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, उपाध्ये कॉलेज,नाशिक यांना हा उपक्रम चालविण्यासाठी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि.22) होस्टेलला प्रवेश दिला जाणार आहे.
सुपर 50 उपक्रमांतर्गत निवड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 50 विद्यार्थ्यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली. या कार्यशाळेत सुपर 50 उपक्रमाचा उद्देशाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी माहिती दिली. इयत्ता 12 वी नंतर जेईई, सीईटी, जेईई अॅडव्हान्स या परीक्षांची तयारी करताना योग्य मार्गदर्शनासह स्वयं अध्ययन हे महत्त्वाचे आहे, सुपर 50 उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक हे स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणार आहेत, पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.
जेईई, सीईटी, जेईई अॅडव्हान्स या परीक्षांची तयारी केल्याने विद्यार्थ्यांना भविष्यात आयआयटी व अभियांत्रिकी क्षेत्रातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करून या परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे. जेईई, सीईटी, जेईई अॅडव्हान्स परीक्षांच्या माध्यमातून नामांकित शैक्षणिक संस्थेत निवड झाल्यानंतर तुमचा आदर्श तुमची भावंडं आणि गावातील इतर विद्यार्थी देखील घेतील, अशाच पद्धतीने आपले संपूर्ण गाव हे शिक्षणाच्या प्रवाहात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या वतीने निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देताना विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, अधीक्षक सुधीर पगार, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा पिंगळकर, वरिष्ठ सहायक धनराज भोई हे उपस्थित होते.
संस्थांचे सादरीकरण
सुपर 50 उपक्रमांतर्गत निविदा प्रक्रियेत निवड घेतलेल्या कल्याणी चॅरीटेबल ट्रस्ट (सपकाळ नॉलेज हब), उपाध्ये कॉलेज व येवला येथील जगदंबा एज्युकेशन सोसायटी या तीन संस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव यांच्यासमोर सुपर 50 उपक्रमांतर्गत संबधित संस्थेकडून पुरवल्या जाणार्या सुविधा व प्रशिक्षण याबाबत सादरीकरण केले.