करोनाच्या धास्तीने मजूरांनी धरली गावाची वाट

मजुरांवर आर्थिक संकट
करोनाच्या धास्तीने मजूरांनी धरली गावाची वाट

नाशिक | Nashik

करोनाचा संसर्गाचा उद्रेक नाशिक शहराबरोबर ग्रामीण भागात ही पसरला आहे.

आता थेट आठवडे बाजाराची गावे, शेतवस्ती, गावागावात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी मृत्युदर वाढल्याने या जीवघेण्या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी शेतवस्ती व अन्य ठिकाणी मोलमजुरी करणारे आदिवासी शेतकऱ्यांनी आपला गाशा गुंडाळून थेट आपल्या गावाकडे जाण्यासाठी लगबग सुरू केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत पुन्हा गत वर्षीप्रमाणे करोनाची दाहकता वाढल्याने आदिवासी भागातील शेतमजुरांवर मजुरी सोडण्याचे अरिष्ट आले आसल्याने मजूर मिळेल त्या वाहनाने थेट आपल्या गावांकडची वाट धरू लागले आहे.

चालू वर्षी तरी हाताला काम मिळेल व मागील वर्षी हाताचे गेलेले काम व उपासमारीची आलेली वेळ विसरून आदिवासी मजुरांनी यंदा दिवाळी नंतर थेट कुटुंबासह रोजगारासाठी गाव, उपनगरे, शेत वस्ती गाठली होती.

शेतीतील हक्काच्या कामात रोजची रोख रोजंदारी बघता यंदा आदिवासी भागातील असंख्य कुटुंबाना टोमँटो, द्राक्षाच्या शेतीतील कामाने मोठा रोजगार दिला होता. मात्र यंदा पुन्हा करोनाच्या संसर्गाचा थैमान मार्चच्या अखेरच्या आठवड्यात सुरू झाले. त्यामुळं पुन्हा शेती शेतकऱ्यांबरोबर मजुरांवर ही अरिष्ट कोसळले आहे.

सध्या द्राक्ष काढणीसाठी मोठ्या संख्येने आदिवासी रोजगारासाठी आले असतांना एप्रिलच्या सुरुवातीपासून गिरणारे भागातून मोठ्या प्रमाणात शेतमजूर आपलं पोटापाण्याच साहित्य सोबत घेऊन करोनाच्या भीतीने थेट गावाकडे निघाल्याचे चित्र रोजच दिसत आहे.

आदिवासी मजुरांच्या उन्हाळ्यातील रोजगारावर कोरोना संकटाने पुन्हा दुसऱ्या वर्षी अरिष्ट कोसळले आहे.त्याचा परिणाम थेट या भागातील रोजगारावर होणार असून अडचणीत असलेला आदिवासी मजूर पुन्हा आर्थिक कोंडीत सापडेल अशी भीतीच आता शेतमजुरांनी व्यक्त केली आहे.

आम्ही दिवाळीपासून थेट नाशिक तालुक्यात शेतमजुरीला जातो. आमच्या भागातील अनेक गाव उन्हाळ्यात रोजगारासाठी बाहेर गेल्याने ओसाड होतात. आम्ही ही पावसाळ्यात घरातील उदरनिर्वाहासाठी दिवाळीनंतर थेट नाशिक तालुक्यात रोजंदारीवर जाऊन पावसाळी जमवल्येल्या पुंजीत पावसाळ्यात घरदार चालवतो. शेतीसाठी दोन पैसे यातून आधार होतो मात्र मागील वर्षी करोना संकटात पूर्ण रोजगार गेला.

- सुभाष सहाळे, गावंध शेतमजूर

आता तर पुन्हा याही वर्षी हातातले काम सोडून करोनाच्या भीतीने गावाकडे जायची वेळ आलीय. आता पुन्हा एकदा उपासमारीची वेळ मजुरांवर आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com