महावितरण सेवकांचे कामबंद आंदोलन

महावितरण सेवकांचे कामबंद आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत व वीज अभियंता व कामगार संघटनांच्या बैठकीत विविध मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात सकारात्मक तोडगा निघू न शकल्याने वीज वितरण अधिकारी, सेवकांतर्फे सोमवारपासून सुरू करण्यात आलेले कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वीज कामगार, अभियंते व अधिकारी तसेच कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवून शासकीय सुविधा मिळाव्यात. करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना 50 लाखांचे अनुदान द्यावे या मागणीसाठी वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारपासून कामबंद आंदोलनास प्रारंभ केला आहे. चंदनपुरी उपकेंद्र व कक्षात प्रवीण वाघ, बी.के. पाटील, निरंकार गोसावी आदी कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून शासना व वीज कंपनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

कृती समितीतील सहा संघटनांच्या पदाधिकार्‍यांची 15 तारखेला ऑनलाईन बैठक झाली होती. त्यात राज्य शासनाने वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा या मागणीवर उर्जामंत्री राऊत यांच्याशी कामगार संघटनांनी संवाद साधला मात्र कुठलाही सकारात्मक प्रतिसाद या चर्चेत निघू शकला नाही.

वीज वितरण अधिकारी, सेवकांचे प्राधान्याने लसीकरण न झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. हजारो कामगार व कुटुबीय बाधित झाले आहेत. आरोग्याची जोखीम पत्करून काम करणार्‍या यंत्रणेला प्रशासन व शासनाने वार्‍यावर सोडल्याची भावना अधिकारी, सेवकांमध्ये निर्माण झाली आहे.

करोना काळातही वसुली व सेवा देण्यात येत आहे. चक्रीवादळात खंंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात अधिकारी व कर्मचार्‍यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या कामाची दखल घेत सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

याकडे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे वाघ यांनी सांगितले. सहा कामगार संघटनांचे पदाधिकारी व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची चर्चा झाली.

त्यात मागण्यांवर तोडगा निघू न शकल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कामगार संघटनांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com