गोदाघाट सुशोभिकरणाला वेग

गोदाघाट सुशोभिकरणाला वेग

पंचवटी । वार्ताहर Panchavati

नाशिक शहरात सद्यस्थितीत स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. याचाच एक भाग असलेल्या गोदाघाट परिसरात ‘प्रोजेक्ट गोदा’ अंतर्गत विविध विकासकामे सुरू असून, संपूर्ण गोदाघाट सुशोभीकरण करण्यात येत आहे. येथील म्हसोबा पटांगणावर दगडी फरशा बसविण्यात येत आहेत. सध्या या कामाला वेग आला आहे.

नाशिक कुंभनगरी म्हणून जगभरात परिचित आहे. तसेच धार्मिक व मंदिरांची भूमी म्हणून देखील नाशिक ओळखले जाते. पंचवटीसह गोदाघाट परिसरात अनेक पुरातन मंदिरे असून, विविध प्रकारचे कुंड आहेत. यांना ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीच्या विकासकामांमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

गोदावरी नदीपात्रात करण्यात आलेले सिमेंट काँक्रीट काढण्यात येऊन काही अंशी गोदेचा श्वास मोकळा करण्यात आला आहे. गोदाकाठचे असलेले काँक्रीट झाकून त्यावर बेसॉल्ट दगडापासून तयार करण्यात आलेल्या विशिष्ट प्रकारच्या फरशा बसविण्यात येत आहेत. जुना भाजी बाजार पटांगणावर अशा प्रकारच्या फरशा बसविण्यात येत आहेत.

हे काम पूर्णत्वास जाण्याआधी नारोशंकर मंदिराच्या पुढील म्हसोबा पटांगणावर सध्या या दगडी फरशा बसविण्याच्या कामाला गती आली आहे. येथील गोपालदास महाराज संजीवन समाधी मंदिराच्या सभोवती हे काम सुरू आहे. येथील हेरिटेज लूक कायम राखण्यासाठीया दगडी फरशा बसविण्यात येत असल्याचे स्मार्ट सिटी कडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे गोदावरी नदीच्या महापुरात हे सर्व काम वाहून जाणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कडून या कामावर करण्यात येत असल्याचा लाखो रुपयांचा खर्च वाया जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com