गुरुजीच्या हातात नाशिककरांची जबाबदारी

करोना काळात महत्वपूर्ण काम
गुरुजीच्या हातात नाशिककरांची जबाबदारी

नाशिक | Nashik

मागील वर्षात करोनाच्या पहिल्या लाटेत परराज्यात जाणार्‍या मजुर, बेघर व निवारा नसलेल्या नागरिकांना निवारा केंद्रात व्यवस्था करणेे, शहरातील लहान मोठ्या झोपडपट्ट्ीतील करोना रुग्ण सर्व्हे, तसेच मुलांना ऑन लाईन शिक्षण कार्यक्रम तयार करण्याबरोबर ऑनलाईन शिक्षण देणे व आजारी वृध्दांची माहिती संकलीत करुन त्यांच्या उपचारासाठी मदत करणे अशा महत्वपूर्ण जबाबदारी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांनी यशस्वीरित्या पार पाडली.

यंदा करोनाचे संकट कायम असल्याने करोना योध्दा होऊन देखील पुन्हा मनपातील शिक्षक अर्थात गुरुजींनी मोठी जबाबदारी घेत नाशिककरांना दिलासा देण्याचे काम सुरु केले आहे.

सन 2020 च्या एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात देशभर लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वात मोठे हाल परप्रांतीय व राज्यातील मजुर वर्गाचे झाले होते. वाहतूक बंद असल्याने शेकडो किलोमीटर पायी प्रवास करीत निघालेल्या मंजुरांना शहरात महापालिकेकडून आश्रय देण्याचे काम करण्यात आले होते.

असहाय बनलेल्या गोरगरीब, बेसहारा व्यक्तींच्या निवार्‍याची व भोजनासह औषधांची व्यवस्था मनपाकडुन करण्यात आली होती. याची मोठी जबाबदारी मनपाच्या शिक्षकांनी पार पाडली. अगदी शेवटी या मजुरांनी रेल्वे व बसमध्ये आरोग्य तपासणी करुन बसवून देण्यापर्यंत शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली होती.

त्यानंतरच्या काळात शिक्षणाच्या आपल्या जबाबदारीसह आरोग्य सर्व्हे, जनजागृती, वयोवृध्द आजारी व्यक्तींच्या यादी तयार करुन त्यांचा उपचारासाठी मदत अशी अनेक कामे करीत शिक्षकांनी मोठे योगदान देण्याचे काम केले. हे काम करतांना अनेक शिक्षकांना करोनाची बाधी झाली. यानंतर आता 2021 वर्षात करोनाने पुन्हा वर डोके काढल्यानंतर आता महापालिका यंत्रणा झाडुन कामाला लागली असुन याकरिता आता पुन्हा एकदा महापालिका शिक्षक नव्या जोमाने कामाला लागले आहे.

गेल्या काही महिन्यात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांपैकी 60 ते 70 शिक्षकांना करोना बाधा झाली. अशाप्रकारे करोना योध्दा ठरलेले शिक्षक यातून बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन जबाबदारी घेऊन करोना संसंर्ग रोखण्याच्या कामाला हजर झाले आहे.

करोना विषाणू संसर्ग रोकण्यासाठी व यातील मृत्यूचा दर कमी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या 89 प्राथमिक शाळेतील कार्यरत 882 शिक्षकांपैकी 607 शिक्षकांच्या समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन हे शिक्षक कामाला लागले आहे.

आता हे शिक्षक मनपाच्या सहा विभागात णझकउ अंतर्गत पथकांची निर्मिती करुन सर्व नागरीकांची पडताळणी करणार आहे. त्यामधील गंभीर आजार असणारे व्यक्तींचा सर्व्हे करणे, पेशन्ट शोधणे, घरांना स्टिकर लावणे व कामे मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सोपविण्यात आलेली आहेत. बेडची माहिती संकलित करणे आदी कामे करु लागले आहे. अशाप्रकारे करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मनपा प्राथमिक शाळेतील एकूण 827 शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. या शिक्षकांपैकी आत्तापर्यंत 60 ते 70 शिक्षकांना करोनाची लागण झालेली आहे. या शिक्षकांचा 14 दिवसाचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर न डगमगता त्यांना नेमणूक दिलेल्या ठिकाणी ते कामावर हजर झालेले आहेत.

करोनाची लागण झालेल्या शिक्षकांपैकी 2 शिक्षकांचे निधन झालेले आहे. मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षक त्यांना नेमणूक दिलेल्या ठिकाणी जबाबदारीने त्यांचे कामकाज पार पाडत आहेत. दिलेल्या जबाबदारीबाबत उपरोक्त शिक्षकांनी गेल्या एक महिन्यांपासून उन्हाळा, आजार याची काहीही तमा न करता कोणताही विरोध न करता अत्यंत मनापासून व प्रामाणिकपणे काम करत असल्याबाबत प्रशासन अधिकारी सुनिता धनगर यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com