Nashik Trimbakeshwar News : सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम संथगतीने

त्र्यंबकमध्ये गोदावरी 'अविरल' कशी राहणार? नागरिकांचा सवाल
Nashik Trimbakeshwar News : सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम संथगतीने

नाशिक | मोहन कानकाटे | Nashik 

आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) अवघ्या काही वर्षांवर येऊन ठेपल्याने त्र्यंबकेश्‍वरमध्ये (Trimbakeshwar) भाविकांची गर्दी वाढत आहे. भाविकांची (Devotees) कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून त्र्यंबकेश्वरमध्ये विविध सरकारी योजना राबविल्या जात आहेत. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह (Sewage Treatment Plant) भुयारी गटार योजनेची कामे गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. त्यातील नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आतापर्यंत सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून या कामाची मुदत डिसेंबर २०२३ पर्यंत आहे. मात्र, काही महिन्यांपासून या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम संथगतीने सुरु असल्याने हे काम पूर्णत्वास येणार तरी कधी? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

दुसरीकडे त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरीच्या नदीपात्रात (Godavari River) मलजल आणि काळेशार पाणी दिसत असल्याने गोदावरीचा श्वास कोंडला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गोदावरी 'अविरल' कशी राहणार? असाही सवाल भाविक आणि पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. त्र्यंबकेश्‍वरची लोकसंख्या (Population of Trimbakeshwar) ही २०११ च्या जनगणनेनुसार १२ हजार इतकी होती. परंतु, दिवसेंदिवस शहराच्या वाढणाऱ्या विस्तारामुळे त्र्यंबकेश्‍वरची लोकसंख्या ही सुमारे १५ ते २० हजारांच्या आसपास पोहचली आहे. मात्र, सध्याच्या लोकसंख्येनुसार तब्बल २० वर्षांपूर्वी म्हणजेच सन २००३ मध्ये झालेल्या सिंहस्थ नियोजनात गोदावरी कृती आराखडा तयार करताना १.९ एमएलडी क्षमतेचे बांधण्यात आलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र पुरेसे नसल्याने आणि त्र्यंबक नगरपरिषद (Trimbak Municipal Council) त्यावरच अवलंबून राहिल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये जलप्रदूषणाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Nashik Trimbakeshwar News : सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम संथगतीने
Political Special : राजकीयदृष्ट्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक होतंय 'बारामती'; नेत्यांचे सतत दौरे, घडामोडींना वेग

यासंदर्भात काही नागरिकांनी हरित लवादाकडे (Green Arbiter) याचिका (Petition) देखील दाखल केल्या होत्या. त्यानंतर हरित लवादाकडून आदेश प्राप्त होऊनही येथील परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली दिसत नाही. तसेच हरित लवादाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी अस्वच्छतेबाबत १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. दुसरीकडे २००३ मध्ये बांधण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर सुमारे १.८ एमएलडी सांडपाणी तयार होते. यासाठी शासनाच्या वतीने १.९ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

राज्य सरकारकडून त्र्यंबक शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी व भुयारी गटार योजनेसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.आता त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीवर असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची नूतनीकरण प्रक्रिया त्र्यंबक नगरपरिषदेने हाती घेतली आहे. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारण्यात येत असून त्यापोटी पहिला हप्ता म्हणून ३४ कोटी रुपयांचा धनादेशही दोन वर्षांपूर्वी प्राप्त झाला. सध्या या प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा येथील प्रशासकीय यंत्रणेचा प्रयत्न आहे. मात्र, सध्या हे काम संथगतीने चालू असून त्यामध्ये त्र्यंबक नगरपरिषद आणि प्रशासकीय यंत्रणेने लक्ष घालणे गरजेचे आहे.  

Nashik Trimbakeshwar News : सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम संथगतीने
Lalit Patil Arrested : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

असे आहे नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र 

२०१८ मध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत त्र्यंबक नगरपरिषदेने राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला होता. तत्कालीन नगरपरिषदेच्या शहर अभियंत्यांनी केलेल्या गावातील गटार पाईपासह, एसटीपी प्रकल्पाच्या डिझाईननुसार ३९.५२ किमी लांबीच्या पाईपलाइनद्वारे सांडपाणी त्र्यंबकपासून तीन किमी अंतरावरील प्रक्रिया केंद्रावर वाहून नेले जाणार आहे. येथे पंपिंग स्टेशन, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल पंप मशिनरी, सोलर प्लान्ट तसेच ४.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प होत आहे. सांडपाणी व मलनि:सारणाच्या पाण्यावर या 'एसटीपी'त प्रक्रिया होऊन घनकचऱ्याचे केक तयार होतील. त्यांनतर शुद्ध झालेले पाणी शेतात सोडण्यात येईल. तर जुना 'एसटीपी' दुरुस्त करुन त्याचे आऊट्लेट नदीपात्रात न सोडता ते पाणीही नवीन एसटीपीला (STP) जोडले जाणार आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पावसाळा सुरु असल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह भुयारी गटार योजनेची कामे थांबली होती. परंतु, आता पाऊस उघडल्याने तात्काळ कामे सुरु करण्यात येणार आहेत. तसेच या कामाची मुदत डिसेंबर २०२३ पर्यंत असून या कामाला मुदतवाढ मिळावी म्हणून राज्य सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

डॉ. श्रिया देवचके, मुख्याधिकारी, त्र्यंबक नगरपरिषद

Nashik Trimbakeshwar News : सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम संथगतीने
Rohit Pawar : "अजितदादांवरील आरोपामागे..."; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण

त्र्यंबकेश्वर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम एनजीटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पंरतु, एसटीपीच्या कामाला काही शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे हे काम रखडले होते. मात्र, आता शेतकऱ्यांचा या कामाला विरोध मावळल्यामुळे लवकरच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच त्र्यंबक नगरपरिषदेवर सध्या प्रशासकीय राजवट असल्यामुळे अडचणी येत असल्याने कामास वेळ लागत आहे.

पुरुषोत्तम लोहगांवकर, माजी नगराध्यक्ष, त्र्यंबक नगरपरिषद

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com