नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

त्रिमूर्ती चौकातील वाहतुकीचा महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपुलाच्या निर्मितीबाबत पाठपुरावा केल्याने अखेर प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे 120 कोटी रुपये खर्चून बनविला जाणारा हा उड्डाणपूल एका वर्षात पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दिला जाईल, असे आश्वासन सेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी दिले.

सावता नगर येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. दिव्या अॅडलॅब, त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल असा असणारा ह्या उड्डाणपूलाच्या कामाला फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार आहे. याबाबत खा. हेमंत गोडसे यांनीही पाठपुरावा केला. मी स्वतः कागदपत्रांची जुळवाजुळव करून सतत प्रयत्न सुरूच ठेवले.

याबाबतचा निधी सिडको प्रशासक देते का? अशी अपेक्षा असताना त्यांनी मदत केली नाही. महानगरपालिकेच्या मदतीने हे काम पूर्ण होईल याबाबत आनंद आहे. त्रिमूर्ती चौकात अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

शिवाय वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली होती. येथे असणार्या शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना त्रास सहन करावा लागत होता. भाजी बाजाराबाबतही अनेक तक्रारी येत होत्या. नागरिकांचे हे सर्वच प्रश्न मिटून एक आदर्श उड्डाणपूल निर्माण होणार असल्याचे सुधाकर बडगुजर यांनी स्पष्ट केले.