महिला नाशिक प्रीमियर लीग स्पर्धा : नाशिक ब्लास्टर्सला विजेतेपद

महिला नाशिक प्रीमियर लीग स्पर्धा :  नाशिक ब्लास्टर्सला विजेतेपद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी दिल्ली,(Shri Chhatrapati Shivaji Maharaj Memorial National Committee, New Delhi ) विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (Nashik District Cricket Association )संयुक्तरित्या आयोजित महिला नाशिक प्रीमियर लीग 2022 (Nashik Premier League -2022 )क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कर्णधार साक्षी कानडी व प्रशिक्षक मंगेश शिरसाट यांच्या नाशिक ब्लास्टर्स संघाने मिळविले.

अंतिम फेरीत नाशिक ब्लास्टर्स संघाने नाशिक सुपर किंग्सवर 6 गडी राखून विजय मिळविला. कर्णधार साक्षी कानडीने अंतिम सामन्यात नाबाद 60 धावा व 2 बळी अशी अष्टपैलू कामगिरी करून संघाच्या विजेतेपदात मोठा वाटा उचलला. अंतिम सामन्यात नाशिक सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. पण नाशिक ब्लास्टर्स संघाने सुपर किंग्सला 5 बाद 81 वर रोखले व ही धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात पार करून सहा गडी राखून विजय मिळविला.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार साक्षी कानडीने सर्वाधिक 270 धावा व सर्वाधिक 8 बळी या लक्षणीय कामगिरीने पटकावला. तर सर्वोत्तम फलंदाज ठरली 196 धावा करणारी तेजस्विनी बाटवाल. 7 बळी घेणारी पूजा वाघ सर्वोत्तम गोलंदाज ठरली. अंतिम सामन्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात पार पडला.

याप्रसंगी सुचेता बच्छाव, चेअरमन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नगरसेविका नयना गांगुर्डे, भरत गांगुर्डे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सहसचिव माजी नगरसेवक योगेश हिरे, खजिनदार हेमंत देशपांडे, अ‍ॅड. प्रेरणा देशपांडे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी राघवेंद्र जोशी, शिवाजी उगले, स्पर्धेची व्यवस्थापन समिती, स्पर्धेत सहभाग असलेले सहाही संघ, त्यांचे कर्णधार व प्रशिक्षक, स्पर्धेचे पंच, खेळाडुंचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश हिरे यांनी केले.

अंतिम सामन्याचा धावफलक :

नाशिक सुपर किंग्स वि. नाशिक ब्लास्टर्स

नाशिक सुपर किंग्स - 18 षटकांत 5 बाद 81 - निधी भुतडा 18, साक्षी कानडी 2 बळी , नाशिक ब्लास्टर्स 14.2 षटकांत 4 बाद 82 - साक्षी कानडी नाबाद 60. तेजस्विनी बाटवाल 2 बळी., नाशिक ब्लास्टर्स सहा गडी राखून विजयी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com