नाशिक । Nashik

चूल आणि मुल या चौकटीला बाजूला सारत अनेक महिला आज यशाची शिखरे गाठत आहेत. ग्रामीण भागातील महिलासुद्धा याला अपवाद नाहीत. अनेक क्षेत्रात ग्रामीण महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. अशाच काही स्वताच्या पायावर उभे राहून स्वतःला व परिवाराला सक्षम करणाऱ्या महिलांशी साधलेला संवाद. निमित्त महिला दिनाचे.

महिलांनी स्वतःसाठी जगायला हवं

महिला दिन हा एक ठराविक दिवशी साजरा न करता आयुष्यभर साजरा करायला हवा. त्यासाठी कोणत्याही दिवसाची वाट पाहता कामा नये. जेणेकरून पुरुषांमध्ये महिलांप्रती एक प्रकारचा आदर निर्माण होण्यास मदत होईल. महिलांनी कुटुंबासोबत स्वतला वेळ देण आवश्यक आहे. आपल्या आवडी निवडी जोपासायला हव्यात.

-संगीता चव्हाण, माजी नगरसेविका, मालेगाव कॅम्प

महिला स्वतःसाठी कमी, इतरासाठी जास्त जगते

स्री ही स्वतःसाठी कमी इतरांसाठी जास्त जगत असते. त्यामुळे मुळातच महिलांमध्ये ती उर्जा असते. कोणत्याही संकटाला टाळून उभी राहू शकते. समाजासाठी गावासाठी महिला देखील पुरुषांप्रमाणे बदल घडवू शकते. समाजात वावरत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. दारूबंदीसाठी संघर्ष उभा करीत असतांना अनेकानी विरोध केला. परतू मागे न हटता ठामपणे उभे राहिलो अन बदल घडवला.

- ज्योती देशमुख, सरपंच, लखमापूर

महिलांना सन्मान मिळणे गरजेचे

राजकीय क्षेत्रात उतरल्यानंतर अनेकांनी विरोध केला. परंतु पतीचा पाठींबा आणि आत्मविश्वास सोबत होता त्यामुळे या राजकीय क्षेतात उभी राहिली. त्यामुळे कालांतराने एक ओळख निर्माण झाली. त्यामुळे महिलांना प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळायला हवा. जेणेकरून स्री पुरुष हि दरी कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे महिलांनी शिक्षित होण्याबरोबर सक्षम व्हायला हवं.

-मेघा दराडे, राष्ट्रवादी महिला आघाडी, सिन्नर

आपले छंद जोपासा

खऱ्या अर्थाने आज महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे. महिला या आज कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडत समाजासाठी काम करीत आहेत. त्याचबरोबर मनाला वाटणारी प्रत्येक गोष्ट महिलेने केली पाहिजे. आपले छंद जोपासले पाहिजे.

-वर्षा रंधे, शिक्षिका, येवला

एकूणच आता महिलांनी कुटुंबासाठी जगण्याबरोबरच स्वतः साठी जगायला हवं. आपल्या इच्छा, आकांशा यांना वाव देत आपल्या जगण्याचा उत्सव करण्यावर भर दिला पाहिजे, असल्याचे मत या संवादातून जाणवले.