मूलभूत सुविधांसाठी महिलांचे आंदोलन
नाशिक

मूलभूत सुविधांसाठी महिलांचे आंदोलन

Abhay Puntambekar

मालेगाव । प्रतिनिधी

शहरातील पवारवाडी भागात शौचालय, रस्ते, गटार आदी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपातर्फे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ या भागातील संतप्त महिलांनी मनपा प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन छेडले. आयुक्त त्र्यंबक कासार यांनी १५ ऑगस्टनंतर नागरी सुविधांची कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पवारवाडी भागात मनपास कर भरूनदेखील प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने जनतेचे हाल होत आहेत. उखडलेले रस्ते, गटारींचा अभाव, पाऊस झाल्यास चिखलातून मार्गक्रमण करत घर गाठावे लागते. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

शौचालय नसल्याने महिलांचे हाल होत आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार केल्यास विकास आराखड्यात या विभागास मंजुरी नसल्याने प्रशासन व नगरसेवकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

परिसरात अवैध बांधकामांना आळा घातल्याशिवाय या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान अहमद बॅटरीवाला यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेकडो महिलांनी मनपा प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

आयुक्त कासार यांनी आंदोलनकर्ते बॅटरीवालांसह महिलांची भेट घेत पवारवाडी भागाचा दौरा करून प्राथमिकतेनुसार कामे मार्गी लावू, असे आश्वासन दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com