इंदिरानगर । Indiranagar

इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने वडाळागाव येथे डॉक्टरांनी एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परा विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला पोटात दुखत असल्याने (दि२०) रोजी ११.४५ वा. च्या सुमारास वडाळागाव येथील डॉ. मुश्ताक शेख यांच्या दवाखान्यात गेल्या. महिलेने शेख यांना पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्यावर डॉ. शेख यांनी कमरेवर इंजेक्शन घ्यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर संशयित डॉ. शेख यांनी सदर महिलेशी अश्लील चाळे करत महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सदर महिलेने घाबरून आरडाओरड केली असता दवाखान्याच्या समोरील चहाची टपरी चालवणारे शहनाज शेख, त्यांचे नातेवाईक दवाखान्यात आले. घडलेला प्रकार महिलेने सांगितल्यानंतर या नागरिकांनी संशयित डॉक्टरांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉक्टरांनी बचावासाठी हातात कैची घेऊन फिरवली. त्यात दोन जणांना हातावर व पोटावर कैची लागुन दुखापत झाली. सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच डॉ. मुस्ताक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यांचे मेहबूब नगर गल्ली नंबर १ येथे क्लिनिक असुन ते नेहमीप्रमाणे रविवार

(दि.२०) रोजी सकाळी अकरा वाजता क्लिनिक येथे आले असता क्लिनिकच्या बाहेर भिंतीवर इरफान शेख उर्फ चिपडया यांनी त्याचे वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेले बातम्यांचे कात्रण लावले होते. दवाखान्यात अनेक जण येत असल्याने डॉक्टरांनी ते कात्रण कढून फेकून दिले.

याचा राग येऊन सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास इरफान शेख उर्फ चिपडया आला व त्याने डॉक्टरांना तुम्ही माझ्या बायकोशी वाईट वागणूक का दिली असा बनाव करत इरफान त्याचा भाऊ इम्तियाच शेख, फैसल प्यारे मोहम्मद, हिना इरफान शेख व त्यांच्या सोबत असलेल्या चार ते पाच जणांनी येऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करून क्लिनिकची तोडफोड केली. त्यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असुन पो नी निलेश मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपो नि निखिल बोंडे अधिक तपास करीत आहेत.