देवलदरी येथे रानडुक्कराच्या हल्ल्यात महिला जखमी

देवलदरी येथे रानडुक्कराच्या हल्ल्यात महिला जखमी

हतगड | Hatgad

वनपरिक्षेत्र करंजुल( क) अंतर्गत देवलदरी येथील चनीबाई मोतीराम पवार (५३) या महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेस सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, सदर महिला सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेळ्या चरण्यासाठी गेली होती. शेळ्या चारुन झाल्यावर पाणी पाजण्या करीता शेता लगतच्या झऱ्यावर बकऱ्या घेऊन जात असतांना पाठीमागून रान डुकराने जोरदारपणे हल्ला चढविला.

डोक्यावर लाकडाची मोळी असल्याने महिलेला प्रतिकार करण्यास जमले नाही. परंतु तिने आरडाओरड केल्याने स्थानिक शेतकरी मदतीला धावल्याने महिला वाचली. अचानक हल्ला झाल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सदर घटनेची वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कौतिक ढुमसे यांनी तात्काळ दखल घेत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. रानडुक्कराचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com