
नाशिक | Nashik
जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत असून अनेक बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडत आहेत. काही महिन्यांपूर्वी नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.
यानंतर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dindori APMC) निवडणुकीत (Election) विजयी सदस्यांच्या हरकतीच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच घेतांना तात्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (Satish Khare) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते.
त्यानंतर १५ लाख रुपयांची लाच घेतांना नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम (Naresh Kumar Bahiram) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. लाचखोरीच्या या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा दोन वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीचा व्यवसायकर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारतांना जीएसटी महिला अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) रंगेहाथ अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्नेहल सुनिल ठाकुर (५२) (व्यवसाय कर अधिकारी कार्यालय, कृषी औद्यागिक संघ लि. द्वारका, नाशिक) रा. आश्विन हॉटेलजवळ, आश्विन संकुल रो हाऊस, आश्विन नगर, नाशिक) असे लाचखोर जीएसटी महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी त्यांचे कल्पदीप इंडस्ट्रियल सेक्यूरिटी सर्विसेस ही कंपनी दोन वर्षापासून बंद असल्याने तिचा व्यवसायकर रद्द व्हावा यासाठी १३ सप्टेंबर रोजी व्यवसाय कर अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज केला होता.
सदर व्यवसायकर (Business Tax) रद्द करून द्यायच्या मोबदल्यात यातील लोकसेविका स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ५ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती ४ हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर तक्रारीची शहानिशा केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने व्यवसाय कर कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून लाचेची ४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारतांना दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ठाकूर यांना रंगेहाथ अटक केली.
दरम्यान, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, हवालदार प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे, शितल सूर्यवंशी, संतोष गांगुर्डे यांनी केली.