पहाटे ‘फजर’ची अजान भोंग्याविना

पहाटे ‘फजर’ची अजान भोंग्याविना

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत अल्टीमेटम (Ultimatum) देत आज 4 मे पासून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाजविण्याचे आवाहन मनसेना सैनिकांना केले असल्याने

आज सकाळपासूनच शहरातील सर्व मशिदींसमोर सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील बहुतांश मशिदीतून आज पहाटेची फजरची अजान भोंग्यांचा वापर न करता दिली गेली. तर काही मशिदींनी अत्यंत कमी आवाजात अजान दिल्याचे दिलासादायक चित्र आज दिसून आले.

दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये यास्तव जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील (District Police Chief Sachin Patil), अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक प्रदीप जाधव आदींसह सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी जातीने गस्त घालत शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मनसेना शहर प्रमुख राकेश भामरे यांच्यासह माऊली बच्छाव या दोघा पदाधिकार्‍यांना नोटीसा बजावण्यात येवून मनसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांतर्फे करडी नजर ठेवण्यात आली होती. दिवसभरात शहर-परिसरात एकही अनुचित प्रकार घडला नसून शहरातील परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

शहरात व्यापक बंदोबस्त असून संवेदनशील भागात (sensitive area) सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेण्याचा कुणी प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली. औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न काढल्यास 4 मे पासून मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याचे निर्देश दिले होते.

ठाकरेंच्या या अल्टीमेटममुळे शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. पोलिसांतर्फे आयोजित बैठकीत भोंग्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अजान देण्याबाबतची ग्वाही कुल जमातच्या मौलवींतर्फे देण्यात आली होती. त्यामुळे आज पहाटेची फजरची अजान अनेक मशिदीतून भोंग्याचा वापर न करता देण्यात आली तर काही मशिदींनी अत्यंत कमी आवाजात अजान दिली असल्याची माहिती अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली. भोंग्यांचा वापर टाळत अजान देण्याचा निर्णय अनेक मशिदीतून घेण्यात आला तर काही मशिदींनी अत्यंत कमी आवाजात अजान देत सकारात्मक पाऊल उचलल्याने या निर्णयाबद्दल शहरवासियांतर्फे समाधान व्यक्त केले जात होते.

भोंग्यावर अजान झाल्यास त्यास मनसेनातर्फे हनुमान चालिसा वाजविण्यात येवून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांतर्फे महानगरप्रमुख राकेश भामरे यांच्यासह माऊली बच्छाव यांना नोटीसा बजावण्यात आल्या येवून पोलिसांतर्फे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. शहरातील प्रमुख जामा मशिदीसह कॅम्प, संगमेश्वर भागातील मशिदींसमोर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी हे स्वत: शहरात गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

आवाजाच्या क्षमतेची तपासणी

शहरातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या आवाजाचे क्षमतेची तपासणी पोलिसांतर्फे सातत्याने केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्याचे आश्वासन कुलजमातच्या मौलवींतर्फे पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आले आहे. आज पहाटेची अजान अनेक मशिदीतून भोंग्याविना झाली तर काही मशिदींनी अत्यंत कमी आवाजात अजान दिली आहे. शहरात पर्याप्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

शहरासह संपुर्ण जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस यंत्रणा सतर्क असल्याने जनतेने घाबरू नये व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीसांतर्फे घेतली जात आहे. कायदा हातात घेणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देत जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी धार्मिक स्थळांतर्फे भोंग्याच्या परवानगीसाठी पोलीस ठाण्यांमध्ये अर्ज केले जात आहे. या अर्जांच्या चौकशीनंतर परवानगी दिली जाणार असल्याची माहिती पत्रकारांशी वार्तालाप करतांना दिली.

Related Stories

No stories found.