वाईनने भरलेला आयशर हरवला, पहा पुढे काय झालं?

वाईनने भरलेला आयशर हरवला, पहा पुढे काय झालं?

निफाडहुन मुंबई निघाला होता..!

नवीन नाशिक | Nashik

वाईनने भरलेली आयशर (icher) कुठे लावली याचा ड्रायव्हरला विसर पडल्यानंतर आयशर मालकासह ड्रायव्हरने अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Thane) धाव घेतल्यानंतर अवघ्या दोन तासात गुन्हा दाखल होण्या अगोदरच पोलिसांनी आयशरचा शोध घेऊन मालकाच्या ताब्यात दिली.

वाहन चालक पुनम लक्ष्मण पवार ( 50, रा. सावता नगर, नवीन नाशिक ) यांनी निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) विंचूर येथून विंचुर वाईनची (Vichur Wine) सुमारे १५ लाखाची वाईन ( दि.18 ) रात्री त्यांच्या ताब्यातील आयशर ट्रक क्रमांक एम एच १५ जी व्ही ८२८० मध्ये भरून मुंबईसाठी (Mumbai) जाण्यास निघाले. मात्र रात्र झाल्याने रस्त्यातच नवीन नाशकात (Navin Nashik) त्यांचे घर असल्याने त्यांनी सकाळी ( दि.१९ ) मुंबईला जाण्याचे ठरवले.

मात्र रात्रीच्या वेळी गाडी कुठे लावली याचा त्यांना सकाळी विसर पडला. याची माहिती त्यांनी आयशर चे मालक सुरेश शंकर उगले यांना दिली. यावरून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आयशरचा शोध सुरू केला, मात्र त्यांना आयशर मिळून न आल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी,गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांना माहिती दिली.

यावरून गुन्हे शाखेचे सपोनि गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रफिक शेख, राकेश निकम, पोलीस शिपाई नितीन सानप, अनिरुद्ध येवले, मुरली जाधव यांच्या पथकाने नवीन नाशिक परिसरातील मोरवाडी ते पवन नगर, सावता नगर अशा परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बघून गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान सदर गाडी ही एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये खांडे मळा परिसराकडे जात असल्याचे दिसून आले. त्यावरून खांडे मळा परिसरात शोध घेतला असता त्या ठिकाणी सदर आयशर आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी आयशर मध्ये भरलेला माल तपासून बघितला असता तो पूर्ण माल आढळून आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच फक्त दोन तासातच सदर आयशर ट्रक पोलीस ठाण्यात हजर करण्यात येऊन आयशर चे मालक सुरेश उगले यांच्या ताब्यात देण्यात आला. अंबड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com