स्मार्ट सिटी साकारण्यासाठी प्रयत्न करणार

स्मार्ट सिटी साकारण्यासाठी प्रयत्न करणार
नाशिक स्मार्ट सिटी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिककरांच्या स्वप्नातील अपेक्षित स्मार्ट सिटी (Smart City) साकार करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने व समन्वयाने प्रयत्न करीत असताना यात नक्की यशस्वी होणार, असा विश्वास स्मार्ट सिटीचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (Sumant More) यांनी ‘दै.देशदूत’ शी बरोबर संवाद साधताना व्यक्त केला आहे...

मागील सुमारे पाच वर्षात नागरिकांना तसेच महापालिकेत नगरसेवक, पदाधिकार्‍यांना अपेक्षित असलेले स्मार्ट नाशिक (Smart Nashik) झाले नाही असल्या तक्रारी सुरू झाल्या.

या पार्श्वभूमीवर तक्रारी वाढत गेल्याने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्यावर देखील काही नगरसेवकांनी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत त्यांची त्वरित बदली करून कंपनीच बरखास्त करण्याची मागणी केली होती.

तर 2 जुलै 2021 रोजी राज्याचे मुख्य सचिव तथा स्मार्ट सिटीचे अध्यक्ष सीताराम कुंटे (Sitaram Kunte) नाशिकमध्ये आले होते. त्यांच्या उपस्थितीत बैठकीत सदस्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्यानंतर थविल यांची बदली करून त्यांच्या जागी सुमंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोरे यांनी माहिती देताना सांगितले की, मागील सुमारे दीड वर्षापासून करोनाचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे कंपनीच्या कामांची गती मंदावली होती. तर स्थानिक पातळीवर कामगारांची कमतरता होती. कॉन्ट्रॅक्टरचे प्रश्न निर्माण झाले होते.

म्हणून काही प्रमाणात कामे संथ गतीने झाली, मात्र हळूहळू आता परिस्थिती नियंत्रणात येत असून कामाची गती वाढून नाशिककरांना अपेक्षित स्मार्ट सिटी लवकरच तयार करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने (Central Government) त्यांच्या वाट्यातील 500 पैकी 198 कोटी रुपये दिले आहे. यातील 143 कोटी आतापर्यंत खर्च झाले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या वाट्यातील 250 पैकी 96 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. तर महापालिकेने (Nashik Municipal Corporation) अडीचशे कोटी पैकी 200 कोटी रुपये स्मार्ट सिटी कंपनीला दिले आहे.

यामुळे सध्या कंपनीचे काम चालू आहे त्याप्रमाणे पैसे उपलब्ध असून पैसे संपल्यावर मागणी करण्यात येईल. खर्च करण्यासाठी केंद्राचे रक्कम पहिली घेण्यात येते असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्मार्ट रोडसह 23 प्रोजेक्ट स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पूर्ण झाले असून 20 पेक्षा जास्त प्रोजेक्ट सध्या प्रगतिपथावर आहे.

महासभेत महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी स्मार्ट सिटीला महापालिकेने दिलेल्या दोनशे कोटी पैकी शंभर कोटी रुपये शहरातील विकास कामांसाठी परत घेण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत स्मार्ट सिटी कंपनी संचालक मंडळाच्या 2 जुलैच्या बैठकीत चर्चा झाली असून त्या बाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील सराफ बाजार परिसरात पाऊस जास्त पडल्यावर पाणी जमा होण्याची जुनी समस्या आहे. याबाबत युद्धपातळीवर काम सुरू असून या ठिकाणी पाणी जमा होणार नाही. आगामी काळात त्याचे परिणाम नागरिकांच्या समोर येईल, असा विश्वास देखील मोरे यांनी व्यक्त केला तर या ठिकाणी शंभर टक्के पाणी जमा होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी या विषयावर महापालिकेत झालेल्या विशेष महासभेत काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बांधण्यात आलेल्या नव्या स्मार्ट रोड बाबत देखील तक्रारी केल्या होत्या. याबाबत विचारणा केल्यावर आयआयटी च्या माध्यमातून त्याचा सर्वे करण्यात आला असून सध्या तरी त्या रस्त्यात बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com