प्रभागरचना कच्चा आराखडा मुंबईला पाठवणार?

प्रभागरचना कच्चा आराखडा मुंबईला पाठवणार?

नाशिक । फारूक पठाण Nashik

इच्छुकांसह विविध पक्ष तसेच नाशिककरांचे लक्ष लागून असलेल्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा Ward Planing नाशिक महापालिका प्रशासनाने NMC Administration जवळपास निश्चित केला असून येत्या सोमवारी तो मुंबईला जाणार असल्याचे समजते. नाशिकमध्ये सध्या 122 सदस्य असून त्या संख्येत वाढ होऊन आता एकूण 133 सदस्य नाशिक महापालिकेत निवडून येणार आहे. प्रशासनाने यंदा प्रभाग रचना करतांना अनपेक्षित बदल केल्याची चर्चा आहे, मात्र जोपर्यंत शासनस्तरावरून रचना जाहीर होत नाही तोपर्यंत फक्त चर्चा ऐकायला मिळणार आहे.

30 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्र पाठवून आगामी महापालिका निवडणुकीसाठी कच्चा आराखडा तयार करून पाठवण्याचे आदेश दिले होते. त्या दृष्टीने युद्धपातळीवर काम करून प्रशासनाने कच्चा आराखडा तयार केल्याचे समजते. प्रभागरचना तयार करताना गुगल अर्थच्या नकाशाचा आधार घेतला आहे.

नकाशावर प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंगाने दर्शविण्यात येतील. प्रगणक गटांचे क्रमांक व त्या प्रगणक गटांची लोकसंख्या दर्शविली जाईल. जनगणना प्रभागांच्या सीमा, निळ्या रंगाने दर्शविल्या जातील. नकाशावर शहरातील महत्वाची ठिकाणे, जसे, रस्ते, नद्या, नाले, रेल्वे लाईन आदी स्पष्टपणे दर्शविले जाणार आहे. नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शविल्या जातील. नकाशांचा आकार नकाशावर दर्शविलेले प्रगणक गटांचे क्रमांक, लोकसंख्या आदी तपशील वाचता येईल, अशा प्रमाणात असतील. नकाशे सुलभपणे हाताळता यावेत, यासाठी आवश्यक असल्यास दोन किंवा तीन भागात तयार केले जातील.

प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार केला जाईल. त्याच्या हद्दी स्पष्टपणे दर्शविण्यात येतील. प्रत्येक प्रभागामध्ये समाविष्ट झालेले प्रगणक गट व नकाशानुसार त्या प्रभागामध्ये समाविष्ट होणारे प्रगणक गट एकच आहेत, याची खात्री केली आहे. तसेच जनगणनेकडनू प्राप्त झालेल्या लोकसंख्येची आकडेवारी योग्यरित्या दर्शविण्यात आली आहे, याची खात्री केल्यानंतरच कच्चा आराखडा अंतिम होणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार नाशिक महापालिका हद्दीत सुमारे 14 लाख 85 हजार लोकसंख्या होती. त्यात काही प्रमाणात सरासरी प्रमाणे वाढ करून लोकसंख्या व प्रभागातील मतदार संख्या ठरविण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये आगामी महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. यामध्ये 43 प्रभाग तीन सदस्यीय राहणार असून एक प्रभाग 4 चे राहणार आहे. तीन सदस्य प्रभाग मध्ये एकूण लोकसंख्या साधारण 30 ते 35 हजार राहणार आहे, तर एका प्रभागात जो चार सदस्य राहील त्याला सुमारे 40 ते 45 हजार लोकसंख्या राहणार आहे. येत्या 22 नोव्हेंबर रोजी नाशिक महापालिकेच्या वतीने कच्चा आराखडा तयार करून पाठविण्याची तयारी झाल्याचे समजते.

विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवार त्याचप्रमाणे नाशिककर नव्या प्रभाग रचनेची आतुरतेने वाट बघत आहे. अनेक दिग्गज नगरसेवक तसेच नेत्यांनी आतापर्यंत आपले यामुळेच पत्ते उघड केले नाही. जोपर्यंत प्रभाग रचना जाहीर होत नाही तोपर्यंत आपण कोणत्या पक्षातून व कोणत्या प्रभागात निवडणूक लढणार याबाबत कमालीची गुप्तता काही नेत्याने ठेवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com