नाशिक । Nashik

गंगा गोदावरी गटारमुक्त व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घालून अभियानपूर्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे पंचायती श्री निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी येथे सांगितले.

गीता जयंतीनिमित्त स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी नवश्या गणपती ते रामकुंडापर्यंत गंगा गोदावरीची प्रदूषणासंबंधी पाहणी कली. अखेरीस रामतीर्थावरती गंगा गोदावरी पूजन केले तसेच गंगा गोदावरी गटारमुक्त करण्याचा संकल्प केला. यावेळी ते बोलत होते.

स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले, दक्षिण गंगा म्हणून देशभरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने गोदावरी स्नानासाठी येतात. तसेच दर बारा वर्षांनी भरणारा महाकुंभमेळा गोदावरीचे महात्म्य सांगण्यास पुरेसा आहे. असे असताना नदीपात्रात प्रामुख्याने नाशिक शहरातील गटारी कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात आल्या आहेत.

यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. अस्वच्छ, अशुद्ध पाण्यामुळे भाविकांच्या भावनांना तडा जात आहे. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी काही संघटना न्यायालयात गेल्या आहेत. त्यांना काही प्रमाणात यशही मिळाले आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबत आमची मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी भेटीचे निमंत्रण दिले आहे.

गटारमुक्त गोदावरीचा संकल्प व न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी याबाबत त्यांना आपण साकडे घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दुतोंड्या मारुतीपासून रामसेतूपर्यंत गोदावरीच्या पात्राचे काँक्रिटीकरण काढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जगातील करोना महामारी संपूर्ण नष्ट व्हावी तसेच देशात समृद्धता प्राप्त व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना व पूजन केले. तसेच संपूर्ण गोदावरीचे स्वच्छ व निर्मळ गंगेचे पाणी सर्वांना मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली.

गोदावरीची पाहणी करताना श्रीनाथानंद सरस्वती महाराज, सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, शिवसेना उपमहानगरप्रमुख दिगंबर मोगरे, नितीन थेटे, अजय जगताप आदी उपस्थित होते.