
नाशिक । प्रतिनिधी Nashik
दिव्यांगांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सर्व अप्पर आयुक्तांना सूचना देत तीन महिन्यांतून एकदा सभेचे आयोजन करत शासन निर्णयानुसार दिव्यांगांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार करण्याच्या सूचना देत दिव्यांगाबाबतच्या शासन निर्णय यांचेसुद्धा काटेकोरपणे कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त नयना गुंडे यांंनी दिले.
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेची बैठक महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास भवनच्या आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिक येथील प्रशासकीय कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी सुरुवातीला स्वागत व प्रस्ताविक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी केले. बैठकीत आदिवासी विकास विभागातील दिव्यांग कर्मचारी यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे, आदिवासी विकास विभागातील दिव्यांग कर्मचारी यांना इमारतीमध्ये जाण्यासाठी येण्यासाठी लिप्टची तसेच रॅम्प यांची व्यवस्था करणे, दिव्यांग कर्मचारी यांना सेवानिवृत्तीनंतर दिव्यांग सहाय्य आर्थिक मदत अर्थात जुनी पेन्शन सुरु करणेबाबत आदि विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीसाठी आदिवासी विकास भवन उपायुक्त संतोष ठुबे, सहाय्यक आयुक्त दिलीप खोकले, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर जगताप, वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर राव, गजानन रत्नपारखी, मीनाक्षी उन्हाळे, सोनाली सांगळे इ. ठाणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे नानाजी भामरे, महिला पदाधिकारी संगीता गोसावी, शोभना देशमुख, संध्या फालक, कृष्णा राबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आभार संघटनेचे विभागीय सचिव मनोहर नेटावटे यांनी मानले.