उद्योजकांच्या समस्या सोडवणार : मनपा आयुक्त डॉ.पुलकुंडवार

आयमा पदाधिकारी शिष्टमंडळाला आश्वासन
उद्योजकांच्या समस्या सोडवणार :  मनपा आयुक्त डॉ.पुलकुंडवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अंबड आणि सातपूरच्या उद्योजकांच्या (entrepreneurs)विविध समस्यांचे निराकरण करणार आणि सातत्याने बैठका घेऊन त्याबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे आश्वासन नाशिक मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (AIMA)अध्यक्ष निखिल पांचाळ आणि सरचिटणीस ललित बूब यांच्या नेतृत्वाखाली आयमा पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त फुलकुंडवार यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आधीच्या आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी तसेच आयमा परिसरात भेट देऊन प्रत्यक्ष समस्या जाणून घ्याव्यात, अशा आशयाचे निवेदन सादर केले. लवकरच आयमाला भेट देण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले.

अंबड औद्योगिक परिसराच्या मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करावी,अंबड औद्योगिक वसाहतीतील कचरा आणि पालापाचोळा संकलित करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी असावी आणि त्या गाडीला वेगळा रंग द्यावा औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत टेम्पो, बस,आणि रिक्षांसाठी पार्किंगची जागा निश्चित करून द्यावी.औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या भूखंडांना संरक्षक भिंत बांधावी व अतिक्रमणे काढावीत आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

जाचक घरपट्टीबाबतही यावेळी चर्चा झाली. पूर्वी निवासी, वाणिज्य आणि उद्योगसाठी स्वतंत्र दर होते. मात्र तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत निवासी आणि वाणिज्य असे दोन दर ठेवल्याने उद्योजकांना त्याचा जोरदार फटका बसला व त्यांना 4 ऐवजी 44 म्हणजे 11 पट जादा पैसे मोजावे लागतअसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. घरपट्टी जादाची असल्यामुळे वाणिज्यऐवजी पुन्हा औद्योगिक श्रेणीत ठेऊन दिलासा देण्याची मागणी उद्योजकांन केली.तसेच फायरसेस महापालिका आणि एमआयडीसी या दोन यंत्रणांऐवजी एकाच यंत्रणेस भरावा लागेल अशी व्यवस्था करण्याची विनंती केली. या दोन्ही मुद्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचेही पांचाळ यांनी स्पष्ट केले.

अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतून महापालिकेला सर्वाधिक महसूल मिळतो.मात्र त्या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने औद्योगिक साहीत्यांच्या वाहतुकीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. आयुक्तांनी या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष घालावे. औद्योगिक वसाहतींना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी असे उद्योजकांनी आवाहन केले. लवकरच आयमासह औद्योगिक वसाहतींना भेटी देण्याचे आश्वासन फुलकुंडवार यांनी दिले.आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे यांचाही समावेश होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com