बागलाणचा वीजप्रश्न सोडवू - नरहरी झिरवाळ

बागलाणचा वीजप्रश्न सोडवू - नरहरी झिरवाळ

साल्हेर । वार्ताहर Salher

बागलाण तालुक्यात ( Baglan Taluka ) वीजप्रश्न अत्यंत गंभीर असून सुरळीत वीजपुरवठ्यासह शेतीसाठी दिवसा किमान चार ते पाच तास अखंडीत वीज (Power Supply )मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन देतांनाच वेळेवर वीजबिले भरून शेतकरी व नागरिकांनी आपल्या कर्तव्याचे पालन देखील करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ ( Narhari Jhirwal, in-charge Speaker of the State Legislative Assembly )यांनी केले.

अलियाबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ( Aliabad Primary Health Center )नूतन इमारतीचे उद्घाटन करतांना ना. झिरवळ बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. दिलीप बोरसे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, यतीन पगार, पोपट अहिरे, राजाराम गांगुर्डे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना ना. झिरवाळ पुढे म्हणाले, पठावेदिगर गटाचे जि.प. सदस्य गणेश अहिरे यांच्या प्रयत्नातून लिफ्ट सुविधेसह साकारण्यात आलेली आरोग्य केंद्राची इमारत संपूर्ण आदिवासी भागातील आदर्श ठरेल. या ठिकाणी परिसरातील आदिवासी बांधवांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याबरोबरच कर्मचार्‍यांसाठी निवासस्थानांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्रासाठी आपण लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून देवू, असे आश्वासन त्यांनी दिले.

शासनाच्या आदिवासी विकास व वनविभागात ठिकठिकाणी रोजंदारी कामगार कार्यरत आहेत. त्यांना शासन सेवेत कायम करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही देत ना. झिरवाळ यांनी आदिवासी विकास विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या कन्यादान योजनेचा वयोवद्ध देखील लाभ घेतांना आढळून आल्याने ही योजना बंद करण्याचे सुतोवाच केले.

त्याऐवजी इयत्ता पाचवीपासून पुढे शिकणार्‍या मुलींसाठी वार्षिक सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल व संपूर्ण शिष्यवृत्तीचे 25 हजार रूपये एकत्रितपणे संबंधित मुलीस 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अदा केले जातील, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पेसा योजनेंतर्गत लवकरच नोकर भरती करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी शेवटी बोलतांना स्पष्ट केले.

यावेळी जि.प. सदस्य अहिरे यांनी आदिवासी बांधवांना तातडीने व दर्जेदार उपचार मिळण्यासाठी अलियाबाद येथे अद्यावत प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली असून त्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध केल्याचे सांगितले. आपल्या कार्यकाळात गटातील प्रत्येक गावासाठी पाठपुरावा करून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध केला असून रस्ते, वीज, पिण्याचे पाणी व आरोग्याची कामे मार्गी लावल्याचेही त्यांनी नमूद केले.

माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. दिलीप बोरसे, डॉ. तुषार शेवाळे, यतीन पगार, पोपट अहिरे, राजाराम गांगुर्डे, नंदू चौरे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास परिसरातील सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com