वळण रस्ता कामास गती देऊ

विकासकामांचे लोकार्पणप्रसंगी खा.डॉ. भामरेंची ग्वाही
वळण रस्ता कामास गती देऊ

सटाणा । वार्ताहर Satana

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहराबाहेरून जाणार्‍या वळण रस्त्यांसाठी केंद्र शासनातर्फे ६४ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाली आहे. तांत्रिक मंजुरी मिळून केंद्र शासनाच्या ईपीसी समितीसमोर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती देत खा.डॉ. सुभाष भामरे यांनी आगामी काळात बायपास रस्ता कामास गती देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

सटाणा नगर परिषदेच्या वतीने शहरातील दोधेश्वर नाका परिसरात पादचारी पूल व पाठक मैदान परिसरातील नाना-नानी पार्कचे लोकार्पण तसेच चावडी चौक येथील राममंदिर सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खा.डॉ.भामरे बोलत होते.

पिंपळनेर-सटाणा या दुपदरीकरण रस्त्याचे काम मंजूर होऊन गत सहा महिन्यांपासून प्रत्यक्ष कामास सुरवात झाल्याचे स्पष्ट करीत खा.डॉ.भामरे पुढे म्हणाले, शहरातील सटाणा-ताहाराबाद रस्त्यालगत वैकुठधामपासून चांदवड तालुक्यातील मंगरूळ फाट्यापर्यंत रस्ता केंद्र शासनाने मंजूर केला आहे.

वैकुंठधाम व सटाणा-नाशिक रस्त्यालगत जिजामाता उद्यानाजवळ जुन्या पुलांसोबत समांतर नवीन दोन पूल तयार करण्यात येणार आहे. सटाणा शहरापासून मालेगावपर्यंत रस्ता दुपदरीकरणाचे काम केंद्राच्या सीआएफ योजनेतून पूर्ण झाले आहे. शहराच्या चारही बाजूंनी रस्त्यांचे काम पूर्ण होत असतांना शहरांतर्गत होणार्‍या अतिरिक्त वाहतुकीसाठी प्रलंबित बायपास रस्ता नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

बायपास रस्ता कामास गती देतांना सर्वसमावेश संमतीसाठी शहर व तालुकावासियांची जबाबदारी असल्याचे डॉ. भामरे यांनी शेवटी सांगितले.यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, जिल्हा बँक संचालक सचिन सावंत, उपनगराध्यक्ष सुनीता मोरकर यांच्यासह नगरसेवक तसेच भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

बायपास रस्त्यासाठी खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळासमवेत दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपण प्रस्ताव सादर केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बायपास रस्त्याच्या कामासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे व खा.डॉ. भामरे यांनी लक्ष घातल्याने सद्यस्थितीत ६४ कोटी ८० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आाहे. बायपास रस्त्यामुळे शहराचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

सुनील मोरे नगराध्यक्ष, सनपा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com