
नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहरातील वाढता करोना संसर्ग, अपूर्ण पडणार्या सोयी सुविधा, खाजगी रुग्णालयातील स्थिती व अपुर्ण उपाय योजनासंदर्भात नगरसेवक पदाधिकार्यांनी केलेल्या सुचनांसदर्भात लवकरच आरोग्य वैद्यकिय विभागासोबत चर्चा करुन सोडविल्या जातील, असे आश्वासन महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिले.
दरम्यान कालच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर सफाई कामगारांनी प्रवेशद्वारासमोर बसुन ठिय्या आंदोलन केले आणि शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी थेट एका खड्ड्यात बसुन शहरातील खड्डयाच्या स्थितीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले.
नाशिक महापालिकेची मासिक महासभा आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आली. महापौर कुलकर्णी यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या महासभेत प्रारंभी उपमहापौर भिकुबाई बागुल यांनी प्रशासनाला करोनाच्यासंदर्भात दिलेल्या पत्राचे वाचन करीत शहरातील करोना रुग्णांना दिल्या जाणार्या सोयी सुविधा, उपाय योजना तोकड्या पडत असल्याकडे लक्ष वेधले.
त्यांनी शहरातील करोना स्थितीचे वास्तव सर्वासमोर मांडले. त्यांनी करोनाची स्थिती हाताबाहेर गेली असुन प्रशासन काय करते, याची माहिती घ्या आणि उपाय योजना कमी पडत असल्याने याची दखल घ्या असे सडेतोड सांगितले.
यानंतर चर्चेत राकॉ. गटनेते गजानन शेलार यांनी शहरातील खाजगी रुग्णालयात 80 टक्के खाटा आरक्षित केल्या, मात्र सर्व सामान्य जनतेला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. तेव्हा याची माहिती नंबरींग स्वरुपात द्यावी असे सांगत शेलार म्हणाले, करोनासाठी लागणारी औषधे महाग असुन महापालिकेने 6 विभागात खाजगी रुग्णालयातील करोना रुग्णांना पुरवावी अशी मागणी त्यांनी केली.
महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते चर्चेत म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टर रुग्णांची लुट करीत असले तरी चांगले व सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टर देखील शहरात आहे. अशाच डॉक्टराचा टास्क फोर्स बनवून शहरातील महापालिका व खाजगी रुग्णालयातील रुग्णांना चांगली सेवा देणे शक्य होणार असल्याचे सांगितले.
करोना संसर्गाचे वाढते आकडे पाहता याकरिता आता विशेष निधी उभारला जावा. रुग्णालयाची बिले तपासणार्या ऑडीटर यांच्यासोबत फार्मासिस्ट पथके सोबत घेऊन अवाजवी बीलांना आळा घालणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सागितले.
गुरमित बग्गा यांनी करोनाच्या पार्श्वभूमी आवश्यक असलेले फिजीशियन मानधनावर न भरता कायम स्वरुपी भरण्यात यावेत अशी सुचना मांडतांना शहराबरोबर ग्रामीण जिल्ह्याला 156 व्हेटींलेटर पीएम केअर फंडातून मिळाले असुन यातील अनेक व्हेटीलेटर वापराविना पडुन आहे.
जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधुन ते शहरासाठी आणावेत असेही त्यांनी सांगितले. ठक्कर डोम हे कोविड केअर सेंटरचे कोविड रुग्णालयात रुपांतर करावेत याठिकाणी 300 खाटा ऑक्सिजनच्या तयार केल्या जाव्यात आणि स्वामीनारायण येथे कोविड केअर सेंटर उभारावेत अशी मागणी त्यांनी केली.
अशाप्रकारे विविध नगरसेवकांनी केलेल्या सुचनांची दखल घेत महापौरांनी करोनासंदर्भात आरोग्य वैद्यकिय विभागासोबत चर्चा करुन उपाय योजना करण्यात येतील असे स्पष्ट केले.