नाशिक ।प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नाशिकरोड विभागातील प्रभाग 20 मधील जेतवननगर मनपाची नर्सरी ही सध्या अपुर्या सेवक संख्येमुळे दुर्लक्षित झाल्याने आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर या परिसराचा विकास करणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

जेतवननगर येथील नर्सरी पीपीपी तत्वानुसार विकसित करण्याकरिता महासभेने मान्यता दिली असून सन 2017 च्या विकास आराखड्यात ही जागा मेडिकल अँम्युनिटी रिझर्वेशन असून आरक्षण क्रमांक 427 दर्शविले आहे. ही जागा 3455 चौरस मीटर असून प्रत्यक्ष मोजणी नुसार 27 हजार 687 चौरस मीटर असुन यापैकी नर्सरीची जागा 14420 चौरस मीटर गार्डन तसेच जॉगिंग ट्रॅक 6300 चौरस मीटर आणि उर्वरित जागा 6960 चौरस मीटर मध्ये निसर्गोपचार केंद्राची जागा विकसित केलेली आहे.

याठिकाणी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात येऊन हर्बल पार्क व महापालिकेची अत्याधुनिक नर्सरी विकसित करता येणार आहे. साधारणत: 40 ते 50 लाख रुपयांपर्यत याकामी महानगरपालिकेची आर्थिक बचत होऊन अंदाजे रक्कम रुपये दहा लक्ष इतके वार्षिक उत्पन्न होणार आहे.

यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट या निविदा पद्धतीने गुणात्मक प्रस्ताव प्राप्त होऊन त्याची छाननी केल्यानंतर उत्कृष्ट व आकर्षक प्रस्तावांना आर्थिक देकाराची विचारणा करण्यात येईल. त्यामुळे केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या गाईडलाईन नुसार 70 टक्के प्रस्ताव गुणात्मक व 30 टक्के आर्थिक धर्तीवर ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.