ड्रायपोर्टला हवे ते सहकार्य; केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांचे आश्वासन

ड्रायपोर्टला हवे ते सहकार्य; केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांचे आश्वासन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या हितासाठी निफाड येथील ड्रायपोर्ट हा अत्यंत महत्वपूर्ण असून त्यासाठी केंद्र सरकारकडून हवे ते सहकार्य मिळवून देण्याबाबत आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत.असे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार ( Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar ) यांनी दिले.

निफाड सहकारी साखर कारखाना पिंपळस, ता.निफाड यांच्या मालकीच्या 108 एकर क्षेत्र ड्रायपोर्ट करीता जे.एन.पी.टी., मुंबई यांना हस्तांतरण करण्याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार या मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या.

त्या अनुषंगाने डॉ.पवार यांनी गेल्या 15 दिवसांपूर्वी या विषयाबाबत बैठक आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समक्ष भेटून विनंती केली होती. त्यानुसार सोमवारी महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक आयोजित केली होती.या बैठकीस सहकार मंत्री, जे.एन.पी.टी.चे अध्यक्ष आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्ली येथून सहभागी झाल्या. महाराष्ट्र शासनाने योग्य ती आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निफाड सहकारी साखर कारखाना मर्या. पिंपळस, ता.निफाड यांच्या मालकीच्या 108 एकर जागा ड्रायपोर्ट करीता तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री यांना केली.

तसेच डॉ.भारती पवार यांनी देखील नमूद केले की, सदर प्रकल्प हा नाशिक जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या हितासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून त्यासाठी केंद्र सरकारकडून हवे ते सहकार्य मिळवून देण्याबाबत आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com