वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापणार ?

वाघांच्या संशयास्पद मृत्यूंचे प्रमाण वाढले
वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापणार ?
File Photo

नाशिक | Nashik

‘राज्य वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा’ स्थापन करण्यासंबंधीचा विषय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात यावा, याविषयी मुख्य वन्यजीव रक्षकांना पत्र देण्यात आले होते. मात्र, मंडळ सदस्याने केलेली सूचना फारशी गांभीर्याने घेतली गेली नाही. परिणामी, राज्यात वन्यप्राण्यांच्या, विशेष करून वाघांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.

वन्यजीवांच्या शिकारी, त्यांच्या अवयवांचा अवैध व्यापार आणि स्थानिक शिकाऱ्यांना हाताशी धरून सक्रिय झालेल्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांना शह देणारी वनखात्याची प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. महाराष्ट्रात बहेलिया शिकाऱ्यांनी मांडलेला उच्छाद कमी झाल्यानंतर वनखाते सुस्तावले. राज्यात नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी उमरेड-करांडला अभयारण्यात दोन बछडय़ांसह वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाला.

यवतमाळ जिल्ह्यात एक महिन्याच्या अंतराने दोन वाघ मृत्युमुखी पडले. या दोन्ही घटनांमध्ये शिकाऱ्यांनी ‘वायर ट्रॅप’चा वापर केला होता. काही दिवसांपूर्वीच्या घटनेत वाघिणीला थेट जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने ‘राज्य वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखे’ची गरज आणखी तीव्र झाली आहे. अजूनही अशा शिकारीच्या घटनांचा पाठपुरावा करण्यात वनखात्याची यंत्रणा कमी पडत आहे.

सायबर डाटा, न्यायालयीन घटनांचा पाठपुरावा यात यंत्रणा तोकडी पडत असल्यानेच शिकाऱ्यांना शिक्षा मिळण्याचे प्रमाणही कमी आहे. २०१९ मध्ये १९ वाघांच्या मृत्यूंपैकी पाच प्रकरणात शिकारीचे गुन्हे नोंदवण्यात आले. मात्र, अजूनही त्याचा तपास पूर्ण झालेला नाही. तर याच वर्षांत ११० बिबट मृत्युमुखी पडले. त्यातील १७ प्रकरणात शिकारीचे गुन्हे नोंद झाले, पण तपास पूर्ण झालेला नाही.

केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा एक प्रादेशिक संचालक, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन शिपायांसह महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे वन्यजीव गुन्ह्य़ांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे.

भारतात गेल्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४० पेक्षा अधिक वाघ मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी ६४ टक्के वाघांचे मृत्यू महाराष्ट्रातील असून अर्ध्याहून आधिक मृत्यू शिकारींकडे बाेट दाखविणारे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com