आदिवासी भागात रानभाज्यांना बहर !

शहरी भागातही रानभाज्यांना पसंती
आदिवासी भागात रानभाज्यांना बहर !

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पावसाळा सुरू झाला की रानभाज्या ( wild Vegetables ) उगवू लागतात. खतपाणी नसतांना रानभाज्या मोठ्या प्रमाणावर जंगलात पाहायला मिळतात. यंदा रानभाज्याना मागणी वाढली आहे. शक्यतो आदिवासी भागात( tribal areas) खाल्ल्या जाणार्‍या रानभाज्यांना शहरी भागातही पसंती दिली जात आहे.

पावसाळ्यात आदिवासी भागातील रानात, माळरानावर उगवणार्‍या पौष्टिक रानभाज्या बाजारात मिळू लागल्या आहेत. या रानभाज्या विकून अनेक आदिवासी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुके असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण भागात रानभाज्या मोठ्याप्रमाणावर आढळून येतात.

सध्या लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला महागला असून यावर उपाय म्हणून अनेकदा शहरी भागातील नागरिकही रान भाज्यांची चव चाखताना दिसून येतात. त्र्यंबकेश्वर परिसरात पहिने, वाघेरा हरसूल घाटात रानभाज्या विक्रीला आलेल्या आहेत. यामध्ये कोळू, भडदा, चाई, आंबटवेल, चाईचा मोर, चाईची भाजी, शेवळा, कुड्याच्या शेंगा आदींसह विविध रानभाज्यांची पर्वणी असते. रानभाज्या नैसर्गिकरित्या बहरत असल्याने त्यांच्या औषधी गुणांमुळे अनेक व्याधींवर गुणकारी ठरतात.

रानमेवा जपायला हवा!

पूर्वी भाजीपाला उपलब्ध नव्हता तेव्हा याच रानभाज्या खाल्ल्या जायच्या. रानभाज्या आरोग्यदायी असल्याने अनेक आजारांपासून बचाव व्हायचा. त्यामुळे लोप पावत चाललेल्या या रानभाज्यांचे जतन करायला हवे.

खरेदी करताना काळजी घ्या!

रानभाज्यांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेकदा त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेताना शक्यतो स्थानिक आदिवासींकडून त्या घ्याव्यात. त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. ग्रामीण भागातील नागरिकांना या भाज्यांविषयी जास्त अचूक माहिती असते.

देविदास कामडी, सुरगाणा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com