नव्या जलवाहिनीचा घाट कशासाठी?

दुरुस्तीस जाणून बुजून विलंब : पाटील
नव्या जलवाहिनीचा घाट कशासाठी?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 20 वर्षांपूर्वी टाकलेल्या सिमेंटच्या जलवाहिनीचे (Water Supply Pipe Line ) आयुष्य 2040 पर्यंत असताना मनपा ( NMC )प्रशासनाकडून 200 कोटी रुपयांची नवी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव आणला जात आहे. जुन्या जलवाहिनीच्या सक्षमतेचा तज्ज्ञांकडून अभ्यास न करताच प्रशासकीय राजवटीत एवढ्या मोठ्या प्रकल्पाची घाई कशासाठी? असा सवाल माजी महापौर दशरथ पाटील (Former Mayor Dashrath Patil)यांनी उपस्थित केला आहे.

सातपूरला ( Satpur )पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याने सातपूर व शहर परिसरात 11 दिवसांपासून पाणीबाणी सुरू होती.हे काम तातडीने करणे शक्य असताना या पाणी पाइपलाइनच्या दुरुस्तीकडे संबधित अधिकार्‍यांनी मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आरोप दशरथ पाटील यांनी केला. या विलंबाच्या दुरुस्तीमागे नव्या लाइनची मागणी तीव्र करण्यासाठी वातावरण निर्मिती करून 200 कोटीच्या खर्चाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रकार असल्याची शंका दशरथ पाटील यांनी उपस्थित केली.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 2003 च्या कुंभमेळ्याप्रसंगी 1,200 मिमी व्यासाच्या दोन आणि 1,700 मिमी व्यासाची फिल्टर प्लँटपर्यंतची सिमेंटची लाइन टाकण्यात आली होती. त्यावेळी या कामासाठी 40 कोटी रुपये खर्च आला होता. सिमेंटच्या लाइनला कधीच गंज किंवा वाळवी असा धोका नसतो. त्यामुळे ही जलवाहिनी आणखी 20 वर्षे शहराला पाणीपुरवठा करू शकते एवढी सक्षम आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यापूर्वी तज्ज्ञांमार्फत जुन्या वाहिनीचा अभ्यास करावा, त्याबाबतचा अहवाल सार्वजनिक करावा व त्यानंतर नवे काम हाती घ्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली.

नव्या वाहिनीची गरज असल्यास जुनी वाहिनी उखडून न फेकता आहे त्याच स्थितीत ठेऊन अडचणीच्या काळात पर्याय म्हणून उपयोगात आणण्यात यावी. सुस्थितीत असलेल्या सध्याच्या जलवाहिनीला 20 वर्षात केवळ तीन वेळा गळती झाली आहे. एका ठिकाणी गळती लागली म्हणून संपूर्ण जलवाहिनी बदलणे हा निव्वळ उधळपट्टीचा घाट असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

काही अधिकारी नव्या आयुक्तांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करीत आहेत. आयुक्तांनी या प्रकरणाचा स्वत: अभ्यास करावा. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून वस्तुस्थितीची जाणीव करुन देणार आहे.

- दशरथ पाटील, माजी महापौर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com