नद्यांची शोकांतिका कोण दूर करणार?

नद्यांची शोकांतिका कोण दूर करणार?

प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

भारतामध्ये सर्वसाधारणपणे महत्त्वाच्या 400 नद्या ( Rivers ) आहेत. त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. महाराष्ट्रात ( Maharashtra ) कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि कोकणातल्या नद्या या मिळून पाच महत्त्वाची नदीखोरे आहेत. यातील कृष्णा, गोदावरी, तापी आणि नर्मदा या नदीखोर्‍यातून महाराष्ट्राला 55 टक्के पाणी उपलब्ध होऊ शकते; तर कोकणातील 11 नद्यांमधून जवळपास 45 टक्के पाणी मिळू शकते. महाराष्ट्रात मोठ्या आणि मध्यम नद्या जवळपास 112 आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 1121 धरणे ( Dam )असून यामध्ये मोठ्या आकाराची 282 धरणे, तर 75 धरणे मध्यम आकाराची आहेत.

महाराष्ट्रात पश्चिम घाटातील बराचसा भाग येतो. याच पश्चिम घाटामध्ये 120 मुख्य नद्यांची उगमस्थाने आहेत. खरे म्हणजे नद्या ही निसर्गाने आपल्याला दिलेली खूप मोठी देणगी आहे. आपले संपूर्ण भवितव्य नद्यांवर अवलंबून आहे. पण आपण नद्यांची काळजी घेतो का? नदी प्रदूषण ही आजची सर्वांत मोठी समस्या आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे, औद्योगिक प्रकल्पांमध्ये तयार होणारे रसायनमिश्रीत पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडले जाते.

शेती करण्याच्या आधुनिक पद्धतीत रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके यांचा बेसुमार वापर केला जातो. काही पिकांना पाण्याचाही अतिरेकी वापर केला जातो. यामुळे आपल्या जमिनी प्रदूषित झाल्या आहेत. शेतांना दिलेले अवाजवी पाणी झिरपून पुन्हा नद्यांमध्ये, विहिरींमध्ये जाते. पर्यायाने नद्यांचेही प्रदूषण होते. कारण आपल्याकडे बहुतांश शेती नदीलगतच्या भागातच आढळते. नद्यांच्या पाण्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण यामुळे वाढत चालले असून त्यातून शेवाळही वाढत चालले आहे. अशा प्रदूषित पाण्यामध्ये तणवर्गीय वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. केंदाळ किंवा जलपर्णीनी व्यापलेल्या नद्या महाराष्ट्राला नव्या नाहीत.

या प्रदूषणास सर्वस्वी जबाबदार आपण आणि आपली आधुनिक जीवनशैली आहे. दुर्दैवाने, हेच प्रदूषित पाणी आपल्याला वापरावे लागत असल्याने आज आरोग्याचे प्रश्नही गंभीर बनत चालले आहेत.

नद्यांसंदर्भातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाळाचा भरणा. आज राज्यातील, देशातील बहुतांश नद्या व धरणे गाळाने भरु लागली आहेत. बहुतांश नद्यांचे उगम डोंगराळ भागात आहेत. पण या नद्यांच्या आजूबाजूला असणार्‍या डोंगरपर्वतांवरील जंगले माणसाने नष्ट केली आहेत.

परिणामी, या डोंगरांवरील जमिनीची, सुपीक मातीची धूप होण्याचे प्रमाण वाढून नद्यांमधील गाळ वाढला आहे. गेल्या काही वर्षांत अतिपावसाचे प्रमाण वाढल्यानेही डोंगर उतारावरुन वाहून येणार्‍या गाळाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिणामी आज पूर येऊन गेल्यानंतर गावा-गावांमध्ये केवळ चिखलच दिसून येतो. वस्तुतः ती सुपीक मातीच आहे. निसर्गाला एक इंच सुपीक मातीचा थर तयार करण्यास हजारो वर्षे लागतात. त्याचे जतन करुन ठेवण्यासाठी वनस्पतींची मोठी मदत होत असते. पण विकासाच्या नावाखाली डोंगर पोखरले जात आहेत, जंगले नष्ट केली जात आहेत.

पूर्वी नदीकाठावर मोठे वृक्ष असायचे. पण कालोघात हे वृक्ष तोडण्यात आले. परिणामी नदीच्या काठाचीही धूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे नद्यांची पात्रे रुंद पण तळ उथळ झाले आहेत. नद्यांची नैसर्गिक पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. म्हणूनच अलीकडील काळात थोडासा जरी पाऊस पडला तरी पूर येण्याच्या घटना घडतात. दुसरीकडे नद्यांमधून वाळू उपशाचे प्रमाण वाढतेच आहे.

परिणामी नद्यांची पाणी मुरण्याची नैसर्गिक क्षमता कमी झाली आहे. यावर उपाय म्हणजे डोंगर उतारांवर वृक्षलागवड करणे आणि पाणी पूर्णपणे खाली येणार नाही यासाठी सार्‍या बांधणे गरजेचे आहे. नदीकाठावर अर्जुन, वायवर्णा, वाळुंज यांसारख्या नैसर्गिकपणे वाढणार्‍या वृक्षांची किंवा बांबूची लागवड करणे गरजेचे आहे.

याखेरीज माती घट्ट पकडून ठेवणार्‍या वाळा या गवताची लागवड करणे आवश्यक आहे. नद्यांमध्ये कचरा, निर्माल्य, मूर्तीविसर्जन थांबवले पाहिजे. आज अनेक नद्यांचे तळ प्लास्टिकनेच भरलेले दिसतात. प्रदूषित झालेल्या नद्या समुद्राला जाऊन मिळत असल्याने समुद्रही प्रदूषित झाला आहे.

त्यामुळे याबाबत तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत. मुख्य नद्यांना मिळणार्‍या उपनद्या सांडपाणी वाहून नेणारे नाले बनले आहेत. अलीकडेच काही शास्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे येणार्या काळात पर्जन्यमानात नऊ टक्के वाढ होणार आहे. तसे झाल्यास पूर-महापुरामुळे किती दैना उडेल याचा विचार आतापासूनच करण्याची गरज आहे आणि त्यादृष्टीने नद्यांच्या प्रश्नांबाबत तत्परतने पावले टाकणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com