‘नो एन्ट्री’त जाणार्‍या दुचाकीस्वारांंना कोण आवरणार ?

‘नो एन्ट्री’त जाणार्‍या दुचाकीस्वारांंना कोण आवरणार ?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा व मेनरोड भागाला जोडणारा सर्वात वर्दळीचा असलेला महात्मा गांधीरोड सिग्नलवर रेडक्रॉस सोसायटीकडे नो एन्ट्री असताना सिग्नल सुरू असताना दुचाकीस्वार बिनधास्तपणे उलट्या दिशेने शिरतात.

या प्रकारातून मोठा अपघात होण्याची शक्यता असून दुसर्‍यांच्या जीविला धोका पोहोचवणारा धोकादायक प्रकार पोलीस सेवक असताना आणि नसतानाही घडत आहे. या नो एन्ट्रीतून शिरणार्‍या दुचाकीस्वारांना कोण आवरणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नाशिक शहरात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध प्रकारे नियोजन सुरू केले आहे. यात सकाळचे तीन तास व सायंकाळचे तीन तास कामावर जाण्यासाठी व घरी जाण्यासाठी वाहनांच्या गर्दीमुळे अनेक सिग्नलवर वाहतूक कोंडीचे प्रकार घडत असताना आता या ठिकाणी पोलीस सेवक नियुक्त झाल्याने ही कोंडी फोडण्याचे काम केले जात आहे.

असे असताना शहरातील सर्वात वर्दळीचा सिग्नल म्हणून संबोधला गेलेल्या महात्मा गांधीरोड सिग्नलजवळ नो एन्ट्रीत दुचाकीस्वार शिरत असल्याने सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनचालक व पादचार्‍यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

या सिग्नलवरून रेडक्रॉस सोसायटीकडे जाण्यास नो एन्ट्री असताना परशुराम सायखेडकर नाट्यगृह, महात्मा गांधीरोडकडून येणारे दुचाकीचालक सिग्नल सुरू असतानाच रेडक्रॉस व रविवार कारंजा भागात बिनधास्त नो एन्ट्रीत शिरतात.

यामुळे समोरून येणार्‍या वाहनचालकांंसोबत अपघाताची शक्यता आहे. हा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत व पोलीस नसताना सर्रास सुरू आहे. या बेशिस्त दुचाकीचालकांना कोण शिस्त लावणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com