नाशकात समुपदेशनाची गरज नक्की कोणाला?

नाशकात समुपदेशनाची गरज नक्की कोणाला?
बिरबल/birbal

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

आटपाट नगरात सर्व सुखविलास रहावा, नागरिकांनी ग्रीन ज्यूस (Green juice) पिऊन तंदुरुस्त राहावे, असे प्रधानाला नेहमीच वाटत असायचे. हा प्रधान त्यासाठी नाना प्रकारच्या अभिनव योजना आखायचा...

नगरात चोर लुटारु मारेकरी यांचा चांगलाच सुळसुळाट सुटला होता; पण प्रधान मात्र फक्त आपल्या शिरस्त्राण (Helmet) मोहिमेवरच अडून होता. जणू काही शहरात फक्त शिरस्त्राण वापरल्यानेच सारे काही सुरळीत होईल, असे त्याला वाटत होते.

नगरात प्रधानाने नवे 13 कारभारी नेमून तुमच्या सुरक्षेसाठी मी हे देखील करू शकतो, असा संदेशच संपूर्ण नगरवासियांना दिला. परंतु, हे नवे कारभारी नेमल्यानंतर काही गुन्हेगारी (Crime) थांबली नाही.

गुन्हेगारांवरील वचक जणू संपुष्टात आला की काय? अशीच शंका आता नगरवासियांना येऊ लागली होती. कारण नगरात अदमासे दीड महिन्यात चार जणांचे मारेकर्‍यांनी मुडदे पाडले होते; त्यातील काही मारेकर्‍यांच्या मुसक्या आवळण्यात प्रधानाच्या कारभार्‍यांना यश मिळाले असले तरी नगरात घरफोडी, लुटारू, वाहनचोर यांचे प्रमाण कमी होताना दिसतच नव्हते.

नगरात लुटारूंकडून दररोज कुठे सोनसाखळी हिसकावली जात होती. तर कुठे दुचाकी, चारचाकींवर डल्ला मारला जात होते. तर कुठे बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लुटला जात होता. यासह गल्लीतील गुंडांची गुंडगिरीही दुसरीकडे वाढत चालली होती. हाणामारी, प्राणघातक हल्ल्यांच्या प्रमाणातही वाढ होत चाली होती.

एवढे सारे खुलेआम सुरू असले तरी प्रधानाचे म्हणणे एकच होते की, कुठेतरी शिरस्त्राण वापरल्याने नगरातील लोकांना शिस्त लागेल. जर ते वापरत नसतील आपण त्यांच्यावर कारवाई न करता गांधीगिरी करत त्यांचे समुपदेशन करूया.

समुपदेशनसाठी (counseling) प्रधानाने आपल्या खास गोटातील कारभार्‍यांना कामाला लावले. शिरस्त्राण आणि त्यानंतर समुपदेशन मोहीम सुरू झाली. शिरस्त्राण नसलेल्या नागरिकांना पकडणे, त्यांना 2 प्रहरचे समुपदेशन करणे अशी मोहीम सुरू झाली. आणि या आरंभशूर मोहिमेचे स्वागत तर झाले नाही मात्र नागरिकांनी टीकेची झोड उडाली.

टीकेमध्ये सर्वाचा सूर एकच होता की नगरात लुटारू, मारेकरी यांचा बंदोबस्त करा. ती अतिशय महत्त्वाची मोहीम आहे. या टीकेनंतर मात्र नक्की नागरिकांचे समुपदेशन करायचे की प्रधानाच्या कारभार्‍यांचे की खुद्द प्रधानाचे करायचे, हा सवाल आता नागरिकांनी उठवला नाही म्हणजे मिळवले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com