गोदाकाठच्या रस्त्यांची दुरुस्ती कधी?

गोदाकाठच्या रस्त्यांची दुरुस्ती कधी?

निफाड | आनंदा जाधव Niphad

निफाड तालुक्याच्या Niphad Taluka गोदाकाठ भागातील विकासाच्या धमण्या समजल्या जाणार्‍या सर्वच रस्त्यांची Roads अतिशय चाळण झाली असून याबाबत परिसरातील शेतकर्‍यांनी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींना अनेकवेळा निवेदन देवून व समक्ष भेटून कैफियत मांडली. मात्र अद्यापपर्यंत त्याची दखल घेतली गेली नाही. आता पावसाळ्यात Rainy seasonतर याच खड्डयात पाणी साचल्याने खड्डयाचा अंदाज येत नसल्याने वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढून बाजारपेठेत शेतमाल नेण्याबरोबरच या रस्त्याने प्रवास करणे अवघड बनले आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील विकासाच्या धमण्या समजल्या जाणार्‍या या रस्त्याची दुरुस्ती होणार तरी कधी असा प्रश्न जनता विचारू लागली आहे.

निफाड तालुक्यात गोदाकाठच्या शेतकर्‍यांसाठी सायखेडा ही प्रमुख बाजारपेठ असून या बाजारपेठेला जोडणार्‍या रस्त्याची हालत दयनिय झाली आहे. यात सर्वात रहदारीचा रस्ता म्हणजे मांजरगाव ते सायखेडा. मात्र रस्त्यावरील वाढते खड्डे वाहनचालक, प्रवाशी यांचेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. तर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या तळवाडे, पिंपळगाव निपाणी ते सायखेडा या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षात दुरुस्तीच झाली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात खड्डयांसह धुळीचे साम्राज्य तर पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते.

आभाळचं फाटलं तिथं ढिगळ तरी कोठवर लावणार. देवगाव ते रूई फाटा हे अंतर अवघे 5 कि.मी. मात्र या रस्त्याने पायी चालणे अवघड झाले आहे. गेल्या दहा वर्षात या रस्त्याला साधी खडी की मुरुम देखील न टाकल्यामुळे या रस्त्यावरील खड्डयांची मजल दोन-दोन फुटापर्यंत गेली असून बाजारपेठेत शेतमाल कसा अन् कोठे न्यावा असा प्रश्न खेडलेझुंगे, कोळगाव ग्रामस्थांना सतावत आहे. त्यातच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या अग्निदिव्याचा सामना करावा लागत आहे. देवगाव ते मानोरी आणि देवगाव ते भरवसफाटा या रस्त्याची हालत न विचारलेली बरी.

रस्त्याला पडलेला काटेरी झुडपांचा वेढा अन् अनेक ठिकाणी अरूंद झालेला रस्ता त्याचबरोबर दगड गोट्यांचे साम्राज्य त्यामुळे रस्त्याचे दुखणे म्हणजे ‘सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही’ अशी काहिशी अवस्था. धारणगाव ते नांदूरमध्यमेश्वर हा 6 कि.मी. चा रस्ता गेल्या 15 वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्ता दुरुस्तीची अनेकवेळा भुमिपूजने झाली. मात्र प्रत्यक्ष कामाला घोडं कुठं अडलं समजत नाही. शेतकरी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतमजूर यांना म्हाळसाकोरे बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी जवळचा असणारा म्हाळसाकोरे ते तारूखेडले या रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून हा रस्ता अनेक ठिकाणी अरूंद झाला आहे.

रस्त्यावरील खड्डे आणि साईडपट्टयांनी गाठलेली खोली वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याप्रमाणेच म्हाळसाकोरे ते कोमलवाडी या रस्त्याची तीच अवस्था झाली आहे. चिखल आणि वाढते खड्डे यामुळे पायी चालतांना देखील कसरत करावी लागते. तारूखेडले-करंजी-ब्राम्हणवाडे या रस्त्याला सध्या कुणीही वाली नाही. नागरिकांनी अनेकवेळा निवेदने दिली, आंदोलने केली मात्र आश्वासनापलिकडे पदरात काही पडले नाही. देवगाव ते कानळद असो की कोळगाव ते कानळद रस्ता असो. दिंडोरी ते गाजरवाडी आणि गाजरवाडी ते धारणगाव या रस्त्याची अनेक वर्षात दुरुस्तीच झाली नाही. त्याचप्रमाणे तालुक्याच्या उत्तर भागातील दोन बाजारपेठांना जोडणारा खानगाव नजिक ते लासलगाव या रस्त्यावर देखील खड्डयांचे साम्राज्य वाढले आहे. तर भाऊसाहेबनगर ते सुकेणे तसेच भाऊसाहेबनगर ते दगडखाण या रस्त्याची गेल्या पंधरा वर्षात दुरुस्तीच झाली नाही.

तसेच पिंपरी ते पातळी रस्त्याची देखील तीच अवस्था झाली आहे. तळवाडे ते पाटपिंप्री रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या रस्त्याने सायकल देखील चालविता येत नाही. गोदाकाठच्या भेंडाळी ते म्हाळसाकोरे या रस्त्याला पडलेले खड्डे प्रवासासाठी मोठा अडसर ठरत आहे. एकूणच गोदाकाठ भागातील कुठलाही रस्ता घ्या ‘खड्डेच खड्डे चोहीकडे गेला रस्ता कुणीकडे’ अशी अवस्था झालेली. निवडणुका आल्या की नेते मंडळी येतात आणि आश्वासनांचा पाऊस पाडतात. आम्हीच जनतेचे कसे तारणहार असा उसना देखावा दाखवत निघून जातात.

गोदाकाठचे प्रश्न तसेच राहतात. परिसराचे रस्ते चांगले असतील तर दळण-वळण वाढेल, शेतमाल बाजारपेठेत वेळेवर पोहचू शकेल. नागरिकांचा प्रवास सुखकर होऊ शकेल. मात्र इच्छाशक्तीचा अभाव असल्याने या परिसराचे रस्ते अद्याप दुरूस्त होत नसल्याने गोदाकाठच्या विकासाची गंगा काहिसी मंदावली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामी अधिकारी, पदाधिकारी यांनी वेळीच लक्ष देवून ते दुरुस्त करुन घेणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com