बिटको रुग्णालयातील समस्या केव्हा सुटणार?

जगदीश पवार यांचे पालकमंत्री, आयुक्तांना निवेदन
बिटको रुग्णालयातील समस्या केव्हा सुटणार?

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

महापालिकेच्या येथील जुन्या बिटको रुग्णालयातील ( Bytco Hospital ) समस्या कायमच्या सोडवून गरीब रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश पवार (Former corporator Jagdish Pawar ) यांनी केली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Bhujbal ) तसेच आयुक्त रमेश पवार यांची भेट घेऊन त्यांनी याबाबतही निवेदन दिले.

बिटकोमध्ये रुग्णांना अनेक वर्षांपासून मदत करणारे जगदीश पवार म्हणाले की, पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन जुन्या व नवीन बिटकोतील समस्या त्यांच्या निर्देशनास आणल्या. त्यांना निवेदन दिले. त्यांनी तातडीने आयुक्त रमेश पवार यांना बोलावून उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. आयुक्त लवकरच दोन्ही बिटको रुग्णालयांची पाहणी करणार आहेत. आरती मांजलकर ही आठ महिन्याची गरोदर महिला सोनोग्राफीसाठी बिटकोत आली असता सोनोग्राफी मशिन बंद असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

भगवान आहिरे यांच्या नातीचे पोट दुखत होते. तिलाही सोनोग्राफीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले गेले. अशाच व्यथा रोज अनेक रुग्णांच्या वाट्याला येत आहेत. बिटकोत लहान बाळांसाठी ऑक्सिजन नाही आणि ते देण्याची मशिनरी नाही. बिटकोत सोमवारी व गुरुवारी ओपीडी वरच्या मजल्यावर भरते. त्यामुळे गरोदर महिलांना त्रास होतो. फिजीशयन नसल्याने टीबी, बीपी, शुगर तसेच गरोदर महिलांची तपासणी आदी गोष्टी साधे डॉक्टर करतात. तेच औषध देतात. गरोदर महिला व रुग्णांना सिव्हीलला पाठवले जाते. गरीब रुग्णांच्या जीवाशी रोज खेळ सुरु आहे.

बिटकोतील ऑपरेशन थिएटरची दुरवस्था झाली आहे. त्यातील यंत्रणाही जुनी झाली आहे. आर्थोपेडीक, डेन्टिस्टचे साहित्य नसल्याने रुग्णांचे हाल होतात. या ठिकाणी मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांची (सीएमओ) संख्या कमी आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. महिनाभरापासून मोतीबिंदूसह डोळ्यांचे ऑपरेशन्स बंद आहेत. डोळ्यांचे ऑपरेशन होणार नाहीत, तुम्ही झाकीर हुसेन रुग्णालयात जा, असे रुग्णांना सांगितले जाते. येथे कान, नाक, घसा यांचा तज्ज्ञ डॉक्टर नाही. सोनोग्राफी मशीन आहे पण ते चालविणारा रेडिओलॉजिस्ट नाही.

या सर्व गोष्टींमुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. आर्थिक फटका बसतो. बिटकोतील रक्तपेढीत रक्त नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. अनेकदा बाहेरून रक्त मागवावे लागते. बिटकोतील सरकारी महालॅबचे रिपोर्ट वेळत येत नाहीत. तसेच बिटकोच्या स्वतःच्या लॅबमध्ये टेस्टिंग होत नाही. तिसरी कृष्णा लॅब सुरु आहे. तिन्ही लॅबच्या तीन तर्‍हांमुळे गरीब रुग्ण गोंधळून जात आहेत. करोना काळात हजारो रुग्णांना जीवदान देणारे, गरीब करोना रुग्णांचे कोट्यवधी रुपये वाचवणार्‍या नवीन बिटकोचेही हाल आहेत.

नवीन एमआरआय मशीन हे ऑपरेटर नसल्याने तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून रिपोर्टस आणावे लागतात. नवीन बिटकोत ऑपरेशन थिएटर व अन्य सुविधा नाहीत तरीही जुने बिटको हे नवीन बिटको रुग्णालयात शिफ्ट करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला नागरिकांचा विरोध असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com