नवीन नाशिक । निशिकांत पाटील New Nashik

नाशिक शहरातून राज्यभरासह देशभरात जाणार्या व येणार्या खासगी बससेवा अद्याप पर्यंत सुरु न झाल्यामुळे या सेवेवर अवलंबून असलेल्या लोकांसह इतर उद्योगांवर देखील परिणाम झाला असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

22 मार्चपासून खासगी बस, कार सेवा बंद आहेत याचा परिणाम मालक वर्गासह चालक, वाहक, बुकिंग करणार्या एजन्सी, गॅरेज व्यावसायिक व त्याठिकाणी काम करत असलेले सेवक यांच्या कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढवले आहे. नाशिक शहरात सुमारे एक हजार खासगी बस आहेत व त्यावर अवलंबून असणार्या यंत्रणा म्हणजे एका गाडीमागे सुमारे वीस लोक असतात.

नाशिक शहरातून मुंबई, पुणे, शिर्डी, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातुर, यांसह परराज्यात इंदोर, गोवा, जोतपूर, बंगळुरू, भोपाळ आदी ठिकाणी बस जातात व त्या ठिकाणाहून किंवा नाशिकमधून प्रवासी वाहतुकीसह नाशकातील द्राक्ष किंवा लहान उद्योग धंद्यांना लागणार्या सामानाची या खासगी बसमधून अल्पदरात ने-आण बंद असल्याने त्या व्यावसायिकांवर देखील आर्थिक संकट कोसळले आहे.

गेल्या पाच महिन्यापेक्षा जास्त काळ बस उभ्या असल्याने गाड्यांच्या दुरुस्तीसाठी येणारा खर्चदेखील मोठा आहे. यासाठी व्यावसायिक यंत्रणा उभ्या करतील मात्र शासनाचे सर्व नियम पाळत या सेवा सुरू होणे गरजेचे असल्याचे मत ब्रिजमोहन टुरिझम प्रा. लि. चे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी व्यक्त केले. खासगी बसकडून शासनास लाखो रुपयांचा कर मिळतो.

यामध्ये 13 सिट पुढील गाडीस एक वर्षांसाठी प्रतिसिट विना वातानुकूलित गाडीसाठी सुमारे 1950 रुपये तर वातानुकूलित गाडीसाठी हा कर 6 हजार 500 रुपये कर द्यावा लागतो. स्लिपर कोच या गाडीसाठी हा कर 7 हजार रुपये प्रतिसिट असा शासनास द्यावा लागतो. एकट्या नाशिक शहरातून शासनास लाखो रुपये कर स्वरूपात मिळतात.

या तुलनेत एस टी महामंडळाचे कर स्वरूपात भरण्याचे दर खुपच कमी असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचे उपाध्यक्ष योगेश दुसाने यांनी दिली. शासनास भरावयाचा कर हा लॉकडाऊन काळ वगळून घेतला जाईल का याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सरकारने एस टी महामंडळाची प्रवासी व मालवाहतूक सेवा सुरू केली ही चांगली बाब आहे. परंतु खासगी बससेवा बंद असल्याने यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. शासनाने भेदभाव न करता ही सेवा सुरू करावी.

दिलीपसिंग बेनिवाल, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना,सल्लागार