लखमापूर । Lakhmapur (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील बळीराजावर प्रत्येक हंगामात अस्मानी व सुलतानी आर्थिक संकटाची साखळी कायम राहिल्याने बळीराजा मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे अश्रू कोण पुसणार, असा सवाल निर्माण झाला आहे.

मागील दोन हंगामापासून दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला उत्पादनाच्या बाबतीत ‘येरे माझ्या मागल्या’ ही मालिका कायम चालू असल्यामुळे तसेच शेतीमध्ये पिकविलेल्या शेती मालाला योग्य हमीभाव मिळत नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा कायम स्वरुपी आर्थिक संकटात सापडत गेला आहे.

मागील द्राक्षे हंगाम करोनाच्या महामारीने वाया गेला. शेतीमध्ये असंख्य भांडवल खर्च करून जगविलेल्या द्राक्षे बागेतील पिक कवडी मोल भावाने विकावी लागली. त्यामुळे येथून शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसण्यास सुरुवात झाली.

कांदा पिकांवर अपेक्षा असतांना सुरुवातीला चांगला भाव मिळाला. परंतु नंतर मात्र कांद्याला भाव अपेक्षा सारखा न मिळाल्याने शेतकरी वर्गाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. अतिशय मेहनत घेऊन कांद्याचे रोपे उपलब्ध करून कांदा पिके घेतली.

मजुरी दुप्पट भावाने दिल्यानंतर कांदा लागवड करून घेतली. परंतु परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. याही पिकामध्ये शेतकरी वर्गाला आर्थिक उत्पन्न मिळविण्यात माघार घ्यावी लागली.

आता तर उन्हाळ कांद्याची आवक बाजारपेठेत कमी होत आहे. त्यांची जागा नव्या लाल कांद्याने घेतल्याने उन्हाळ कांद्याचे भाव कमी होण्याच्या मार्गावर दिसत आहे. त्यामुळे बळीराजां पुन्हा आर्थिक संकटाच्या खाईत पडण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टोमॅटो पिकाने शेतकरी वर्गाची बर्यापैकी आधारांची भूमिका घेतल्याने व नगदी भांडवल उपलब्ध झाल्याने इतर पिकांना उभे करण्यासाठी शेतकरी वर्गाला बळ मिळाले. सध्या टोमॅटोचे भाव स्थिर असल्यामुळे नुकसान व गेलेले भांडवल भरून काढण्यासाठी टोमॅटो पिकावरील शेतकरी वर्गाच्या आशा उंंचावल्या आहे.