दिंडोरी चौफुली मोकळा श्वास कधी घेणार ?

वाहतूक कोंडीमुळे सिग्नल, नो पार्किंग झोन मागणी
दिंडोरी चौफुली मोकळा श्वास कधी घेणार ?

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी ग्रामीण रुग्णालय (Dindori Rural Hospital) ते संस्कृती लॉन्स पर्यंत होणार्‍या वाहतूक कोंडीवर (Traffic jam) उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) रस्ता रुंदीकरण (Road widening) करण्यात आले.

परंतू लगतच्या दुकान व हॉटेलमध्ये जात असतांना रस्त्याच्या कडेला वाहन न लावता वाहनधारक रस्त्यावरच वाहने लावून बेशिस्तपणाचा कळस गाठतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कार्यवाहीचा बडगा उगारुन चौफुलीवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याची मागणी केली जात आहे.

दिंडोरी ग्रामीण रुग्णालय ते संस्कृती लॉन्स पर्यंत रस्ता वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. या अंतरावर बँक, रासायनिक खतांची दुकाने, कपड्यांचे दुकाने, हॉटेल व किरकोळ विक्रेते आदी विविध व्यवसायाची दुकाने व कार्यालये आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. या ठिकाणी येत असतांना आपल्या जवळील वाहन रस्त्यावर कुठेही लावून खरेदीसाठी जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. याला पर्याय म्हणून या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. जेणेकरुन दोन वाहने एका दिशेने पार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

साधारणत: दिंडोरीचा (dondori) मुख्य चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या अधिक जाणवते. नाशिककडून (nashik) वणीकडे (vani) जाणारा रस्ता तसेच स्वामी समर्थ केंद्राकडे जाणारा रस्ता, पालखेड धरण (Palakhed Dam) व शिर्डीला (shirdi) जाणारा जवळचा रस्ता असे महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारी ही चौफुली आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतू चौफुलीवरील बेशिस्त वाहनांच्या पाकिंगमुळे (parking) आजतागायत या चौफुलीवरील वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने चौफुलीवरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालय ते संस्कृती लॉन्स पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मोहीम हाती घेत ती यशस्वी केली.

या रस्त्याचे रुंदीकरण (Road widening) झाले परंतू ते रुंदीकरण रस्त्यावरील चालणार्‍या वाहनांसाठी होते की दुकानात जाणार्‍या ग्राहकांसाठी वाहनतळ (parking) होते हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. कारण वाढवलेल्या रस्त्यावर वाहने उभी केलेली दिसतात. त्यामुळे जर एखादे मोठे वाहन आलेच तर त्याला थांबुन रहावे लागते. त्यामुळे लांबच लांब रांगा बघावयास मिळत आहे. कित्येक दिवसांपासून तेथे वाहतूक सिंग्नल (Traffic signal) लावण्याची मागणी होत आहे. परंतू ती अद्याप पर्यंत पूर्ण झाली नाही. वाहतूक कोंडीमुळे लांबच लांब रांगा लागल्या की दिंडोरी पोलिस ठाण्याचे (Dindori Police Station) कर्मचारी येवून वाहतुक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात.

ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यापर्यंत पोलिस कर्मचार्‍यांची दमछाक होते. याचदरम्यान जर एखादी रुग्णवाहिका अत्यावश्यक रुग्णाला नाशिकला घेवून जात असेल तर मात्र ती रुग्णवाहिका गर्दीतुन बाहेर काढावी कशी ? हा प्रश्न पडतो. अशा वाहतूक कोंडीत जर रुग्णवाहिका अडकली तर त्या रुग्णाला आवश्यक कालावधीत उपचार मिळत नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू देखील होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे या चौफुलीवरील वाहतूक कोंडी सुरळीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेवून या वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय शोधणे आवश्यक आहे.

नो पाकिंग झोन घोषित करण्याची गरज

दिंडोरी नगरपंचायतीने ट्राफीक झोन घोषित करणे आवश्यक आहे. दिंडोरी ग्रामीण रुग्णालय ते संस्कृती लॉन्स पर्यंत ट्राफीक झोन घोषित करुन नगरपंचायतीमध्ये तसा ठराव समंत करुन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जेणेकरुन ती मागणी मान्य करुन वरिष्ठ पोलिस अधिकारी स्थानिक पोलिसांना बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने लावणार्‍या वाहनधारकांवर कार्यवाही करण्याचा आदेश देतील.

तत्पुर्वी नगरपंचायतीने देखील त्या वाहनधारकांना पेे अण्ड पार्क या युक्तीप्रमाणे वाहने लावण्याची सोय करुन देण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी नो पाकिंगचे फलक लावले असले तरी त्याचा उपयोग सध्या होतांना दिसत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत व पोलिस प्रशासन हे तीनही विभाग एकत्र आल्याशिवाय या वाहतूक कोंडीचा निर्णय लागणार नाही हेच आजचे वास्तव आहे.

दिंडोरी चौफुलीवरची वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाया जातो. चौपदरीकरण करुन येथील समस्या सोडवण्यासाठी संंबधित विभागाने प्रयत्न केले असले तरी योग्य नियोजनाअभावी ती तोकडीच ठरली. या चौफुलीवर वाहतूक सिंग्नल लावावी,अशी कित्येक दिवसांची मागणी आजही प्रलंबित आहे. रस्त्यावर वाहने लावणार्‍यांवर कार्यवाही व चौफुली वाहतूक सिग्नल लावणे ही काळाची गरज आहे.

- सचिन देशमुख, माजी उनगराध्यक्ष, दिंडोरी नगरपंचायत

Related Stories

No stories found.