
खेडलेझुंगे । वार्ताहर Khedlezunge
रुई फाटा ते खेडलेझुंगे रस्त्याची दुर्दशा झाली असून, रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याची खंत या परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथील अपघातात मृत्यू झाल्यानंतर आम आदमी पार्टी आक्रमक झाली असून रस्त्यांच्या साईडपट्ट्या भरण्याची मागणी केली जात आहे.
रुई फाटा ते खेडलेझुंगे रस्त्याची दुरुस्ती मागील 2-3 महिन्यांपूर्वीच करण्यात आलेली होती. परंतु, सद्यस्थितीत संपूर्ण रस्ता उखडून गेलेला आहे. रस्त्याने वाहनच काय तर पायी चालणे देखील मुश्किल झालेले आहे. वारंवार तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ व प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी बघायला मिळत आहे. 2-3 महिन्यांपूर्वी झालेल्या कामकाजामध्ये वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ठ दर्जाचे आणि कमी प्रमाणात वापरल्याने आणि साईडपट्ट्या न भरल्याने रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे.
रुई फाटा ते खेडलेझुंगे या रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची तत्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील प्रसाद घोटेकर यांनी गटविकास अधिकार्यांकडे केली आहे. सदरच्या रस्त्याने प्रवास करणे अत्यंत धोकादायक झालेले आहे. काम करतांना ते फक्त पूर्ण करण्याकडे कंत्राटदाराने लक्ष दिले आहे. सदरच्या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य व कामाची क्वॉलिटी अत्यंत निकृष्ट असल्यानेच सदरचा रस्ता लवकर खड्डेमय झालेला आहे. या रस्त्याने दररोज वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पुढे सिन्नर, नगर, पुणेसारख्या शहरांकडे जाण्यासाठी परिसरातील नागरीकांना हा एकमेव पर्यायी मार्ग असल्याने सदरच्या रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे होणे गरजेचे आहे.
खेडलेझुंगे येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरला जातो. तसेच, मराठा विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे महाविद्यालय देखील आहे. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची मोठी रेलचेल या रस्त्याने असते. संत परंपरा लाभलेल्या आणि गोदावरीच्या तीरावर असलेल्या या पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्वाच्या गावाकडे येथील संतवन व 111 फुटी मारुतीच्या आकर्षणामुळे हजारो भाविक ये-जा करत असतात. यामुळे या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे, यामुळे अपघाताचे देखील प्रमाण वाढले असून, 1 मे रोजी येथील प्रगतिशील शेतकर्यास आपले प्राण गमवावे लागले आहे. या रस्त्याने प्रवास करत असतांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुई फाटा ते खेडलेझुंगे रस्त्याबरोबरच धारणगाव खडक ते सारोळे थडी ते खेडलेझुंगे, खेडलेझुंगे ते कोळगांव ते कानळद या गावांना जोडणार्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून, याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. अनेकदा मागणी करून देखील रस्त्याची कामे पूर्ण होत नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दोषींवर कारवाई करावी
वारंवार बांधकाम विभागाच्या बड्या व जबाबदार अधिकार्यांकडे करण्यात आलेल्या आणि चालू असलेल्या कामांच्या अंदाजपत्रकाची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे त्यांनी केलेल्या आणि करत असलेल्या कामांच्या क्वॉलीटीबाबत शंका निर्माण होत आहे. त्यामुळे कामाची पाहणी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.
प्रसाद घोटेकर, कार्यकर्ते, आम आदमी पार्टी
पावसामुळे दुरवस्था
रुईफाटा ते खेडलेझुंगे रस्त्याच्या झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामांबाबत वारंवार तक्रारी करुनही वरिष्ठ पातळीवरून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी आणि कंत्राटदार यांचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्याचे दिसून येत आहे. सदर रस्त्याच्या कामाची लवकरात लवकर पाहणी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी गावकर्यांकडून मागणी होत आहे. बेमोसमी पावसामुळे रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचते. त्यामुळे वाहन चालकास खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे छोटे-मोठे अपघात नित्याचे झालेले आहे.