पंचवीस वर्षापूर्वीच्या वर्गमित्रांनी केली लाखमोलाची मदत

पंचवीस वर्षापूर्वीच्या वर्गमित्रांनी केली लाखमोलाची मदत
देशदूत न्यूज अपडेट

जानोरी । Janori

सर्वत्र सध्या करोना संसर्गाची अवघड परिस्थिती असूनही माणुसकी व मैत्रीची भावना टिकून आहे हे काही घटनांवरून दिसून येत आहे. तशीच एक घटना मोहाडी येथील मित्राच्या बाबतीत घडली.

मोहाडी येथील चंद्रकांत अहिरे यांना व त्यांच्या आई-वडिलांना कोरोना ची लागण झाली. अहिरे हे विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक म्हणून देवळाली येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे पुरेसा पगार नाही व घरची परिस्थितीही बेताचीच.

या परिस्थितीत ते नाशिक येथील कोवीड सेंटरला दाखल झाले. तेथे त्यांनी चार दिवस उपचार घेतले. परंतु तेथे पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने तिथून हलवणे गरजेचे होते.

ही बाब त्यांचे सन 1995 च्या दहावीच्या बॅचचे वर्गमित्र असणार्‍या ’के.आर.टी.मोहाडी’ या व्हॉट्सऍपच्या ग्रुप वर समजली. तेव्हा वर्गमित्र पुढे सरसावले व त्यांनी सर्वांनी अहिरे यांना त्यांचा स्वाभिमान न दुखवता मदत करण्याचे ठरवले.

बघता बघता एकाच दिवसात फोन पे च्या माध्यमातून लाखाच्या वरती रक्कम जमा झाली. त्यात शेतकरी, व्यवसायिक व नोकरदार वर्गमित्रांबरोबरच सासरी गेलेल्या वर्ग मैत्रिणींनीही आपला मोठा सहभाग नोंदवला. नंतर मित्रांनी त्यांना इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे ठरवले. परंतु ऑक्सीजन बेडची आवश्यकता असल्याने ते बेड मिळू शकत नव्हते.

शेवटी वर्गमित्रांनी अहिरे यांची आरोग्यविषयक परिस्थिती जिल्हा परिषद सदस्या अमृताताई पवार यांच्या कानी घातली. परंतु ऑक्सीजन बेड उपलब्धतेची कठीण परिस्थिती असतांनाही अमृता पवार यांनी लगेचच दाखल करून घेण्याची तयारी दाखवली.

त्यानंतर काही वर्गमित्र प्रत्यक्ष जाऊन कोव्हीड सेंटर येथून डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला आणण्यासाठी गेले. परंतु त्या अगोदरच दुर्दैवाने अहिरे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे अहिरे व त्यांच्या आईला दाखल केले.

त्यानंतर गेले सहा दिवस वर्गमित्रांनी कुटुंबातील सदस्यासारखे रेमीडीसीयर इंजेक्शन्स व इतर मेडिसिन, जेवणाचे डब्यासह सह उर्वरित रोख रक्कम दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com