दहावी-बारावीनंतर काय?

दहावी-बारावीनंतर काय?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नुकत्याच दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल ( Results of SSC & HSC )लागला असून स्वाभाविकपणे विद्यार्थी आणि पालक दहावी आणि बारावीनंतर पुढे काय करायचे या विचारात असतात. दहावी-बारावीनंतर घेतलेले निर्णय आपल्या जीवनाला कलाटणी देणारे असतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी क्षमता, कुवत, बुद्धिमत्ता, मूल्यमापन या बाबींचा विचार करणे खूप महत्त्वाचे असते. आपली आवड व कुवतीनुसार करिअर निवडले तर त्यात शंभर टक्के यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

दहावीनंतर पुढीलप्रमाणे शाखांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.

कला : कला शाखेतूनसुद्धा अनेक मार्ग निवडता येतात. पदवीला चांगले गुण संपादन करून डी. एड आणि बी.एडला प्रवेश घेता येऊ शकतो. यामुळे शिक्षक होण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून कला शाखेकडे पाहिले जाते. याशिवाय वकील, मनोरंजन किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतो.

वाणिज्य : सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस, बँकिंग, अकाऊंटंट, फायनान्सिंग, कन्सल्टंट, ऑडिटर इत्यादी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक विद्यार्थी कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेत प्रवेश घेतात.

विज्ञान : या शाखेतील विद्यार्थांचा अभ्यासक्रमात चांगलाच कस लागतो. दहावीतील गुणांवर या शाखेतील प्रवेश अवलंबून असतो. पदवीत उत्तम गुण मिळवून पुढे डॉक्टर, इंजिनिअर इत्यादी महत्त्वाचे करिअरचे मार्ग निवडता येतात.

डिप्लोमा कोर्सेस : दहावीनंतर थेट कोर्सेचाही पर्याय विद्यार्थ्यांपुढे आहे. आवडीच्या क्षेत्रात डिप्लोमा किंवा कोर्सेस करून यशस्वी करिअर करता येऊ शकते. आवड, जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी या गुणवत्तेवर कोर्सेस किंवा डिप्लोमा करून विद्यार्थी करिअरला दिशादेऊ शकतात.

बारावीनंतर पुढीलप्रमाणे शाखांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.

बी. कॉम : बॅचलर ऑफ कॉमर्स या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना अकाऊंटस् ते मॅनेजमेंटपर्यंतचे कौशल्य शिकवले जाते. बी.कॉममध्ये अनेक क्षेत्रांसाठी स्पेशलायझेशन उपलब्ध आहे. आवडीनुसार स्पेशलायझेशन निवडता येते.

बी.बी.ए. : बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षांचा पदवीचा कोर्स आहे. नावानुसार हा कोर्स आपल्याला औद्योगिक आणि व्यवस्थापनमधील कौशल्य शिकवतो.

अकौटंन्सी प्रोग्राम : अकाऊंटमध्ये आवड असलेले विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंटंट (सीए), सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाऊंटंट (सीएमए-सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाऊंटंट) इत्यादी कोर्ससाठी अ‍ॅॅडमिशन घेऊ शकतात. या कोर्सेसला देखील चांगला वाव आहे.

कंपनी सेक्रेटरी : कंपनी सेक्रेटरी (सीएस) हा पूर्णपणे कॉर्पोरेट प्रोफेशनल कोर्स आहे. या कोर्सनंतर बड्या कंपन्यांमध्ये करिअरचे आकर्षक पर्याय आहेत.बहुराष्ट्रीय कंपन्या (एमएनसी)देखील यासाठी उत्कृष्ट वेतन पॅकेज देतात.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स : बारावीनंतर बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट करू शकतात. हॉटेल मॅनेजमेंट सेक्टरमध्येही स्पेशलायझेशनचे अनेक पर्याय आहेत. बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ फूड अ‍ॅण्ड बेव्हरेजेस प्रॉडक्शन, बीबीए हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ केटरिंग मॅनेजमेंट, बीए इन क्युनिनरी आर्टस् (बॅचलर इन कुकिनरी) कला), हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बी.ए. असे अनेक पर्याय उपलब्ध आहे.

ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूरिझम : फिरण्याची आवड असेल तर या क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगलाच वाव आहे. या क्षेत्रात तुम्ही ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूरिझम मॅनेजमेंट, बीएड इन ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूरिझम मॅनेजमेंट, बीए इन ट्रॅव्हल अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, बीए इन ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूरिझम मॅनेजमेंट इत्यादी कोर्सकरू शकता.

बॅचलर ऑफ फॉरेन ट्रेड : बारावीनंतर बॅचलर ऑफ फॉरेन ट्रेडची निवड तुम्ही करू शकता. हा तीन वर्षांचा पदवी कोर्स आहे. यामध्ये लॉजिस्टिक्स, इंपोर्ट, एक्सपोर्ट, सप्लाई चेन मॅनेजमेंट, लॉ पॉलिसी यांसारखे विषय आणि क्षेत्र आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट : इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा बाजार गेल्या काही वर्षांत वाढला आहे. बरेच कार्यक्रम व्यवस्थापन अभ्यासक्रम तीन वर्षांचे असतात. तुम्ही या क्षेत्रातील इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये बीबीए, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये बॅचलर, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये बीएसारखे कोर्सकरू शकता.

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज : ज्यांना व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करायचे आहे तेसुद्धा ते अवलंब करू शकता. हा तीन वर्षांचा कोर्स आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अभ्यासक्रम बीबीएप्रमाणेच आहे. परंतु व्यवस्थापन विशेषतः कौशल्यांवर केंद्रित आहे.

बॅचलर ऑफ लॉ : कायद्याचा अभ्यास करण्याचा अर्थ असा नाही की आपण केवळ वकील होऊ शकतो. बहुतेक सर्व मोठ्या कंपन्या सेक्रेटरीला कायदेशीर सल्लागार नेमतात. थोडक्यात काय तर 10 वी, 12 वीनंतर विद्यार्थी जो निर्णय घेणार आहेत त्या निर्णयाचा भावी आयुष्यभर त्यांना पश्चाताप होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आवडीच्या क्षेत्राला प्राधान्य दिले तर करिअरदेखील यशस्वी होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com