नर्सरी, केजीच्या बालकांच्या शिक्षणाचे काय?

यंदाही प्रवेश नाहीच; पालक चिंतेत
नर्सरी, केजीच्या बालकांच्या शिक्षणाचे काय?
USER

नाशिक । प्रतिनिधी

ऑनलाईन शाळा सुरु झाल्या असून मागील वर्षाप्रमाणे यंदाही ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे पहिली पासूनचे शिक्षण निदान ऑनलाईन सुरु झाले असले तरी नर्सरी, केजीच्या विद्यार्थ्यांंना मात्र घरीच रहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली आहे.

मार्च 2020 पासून करोनाचे संकट असल्याने यंदाचा अभ्यासक्रम देखील ऑनलाईन शिकवण्यात येत आहे. मागील वर्षी करोना संकट आल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर वर्षभर ऑनलाइन अभ्यासक्रमावर शैक्षणिक सत्र सुरू होते; मात्र दुसरी लाट आल्यानंतर परीक्षाच रद्द कराव्या लागल्या. त्यातच नर्सरी, केजीच्या एवढेच नाही तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना देखील शाळा बघायला मिळाली नाही. तरीही ते दुसर्‍या वर्गात गेले आहेत. हीच अवस्था यंदाही असल्याने नर्सरी, केजीचे विद्यार्थी तर घरातच खेळण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान, करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यामध्ये लहान बालकांना अधिक धोका असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच मुलांच्या शैक्षणिक भविष्याचीही चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळे सुरक्षा म्हणून यंदाही ऑनलाईन शिकवणीवर भर दिला जात आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह शाळेची पहिली पायरी ठरणार्‍या नर्सरी व केजीच्या चिमुकल्यांचे हे वर्षही घरीच जाणार असल्याचे जवळपास स्पष्टच आहे.

नर्सरी व केजी म्हणजे लहान मुलांचा अ आ ई शिकण्याचा सुरवातीचा काळ असतो. प्राथमिक शाळेच्या पूर्वतयारीसाठी हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. यासाठी अनेक खाजगी संस्था प्रवेश देण्यासाठी तयार असतात. त्यासाठी विविध माध्यमातून पालकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असतो. अशावेळी पालकही आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल व्हावे म्हणून हजारो रुपये शुल्क भरून पाल्याचा प्रवेश घेत असतात. परंतु गेल्या वर्षापासून नर्सरी व केजीचे वर्गच भरू शकले नाहीत, त्यामुळे पालकांचा हिरमोड झाला आहे.

करोनामुळे मुलांना शाळेत जाता येत नाही किंवा बाहेरही पडता येत नाही. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडपणा वाढला असून टीव्ही, मोबाइल पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे मुलांना आवरणे कठीण झाले आहे.

खडेश्वर खोटरे, पालक, हिरडी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com