नाशिक l Nashik

पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ‘कलाग्राम’ची संकल्पना पुढे आली. केंद्राने निधी पुरविला आणि त्या निधीमधून कलाग्रामच्या वास्तू शहराजवळच्या गोवर्धन शिवारात उभ्या राहिल्या.

मात्र केंद्राची योजना अर्ध्यावरच बारगळली आणि पुरविलेला निधीही संपुष्टात आला. त्यामुळे शहारातील गंगापूरजवळच्या गोवर्धन शिवारात साकारण्यात येत असलेल्या ‘कलाग्राम’ला अंतीम टप्प्यात खीळ बसली आहे.

केंद्राकडून मिळालेला निधी संपल्यामुळे मागील अडीच वर्षांपासून राज्य शासनाकडेकडे उर्वरित कलाग्रामच्या विकासासाठी निधी मिळावा, म्हणून पर्यटन महामंडळाकडून पाठपुरावा सुरू आहे; मात्र अद्याप राज्याच्या पर्यटन खात्याकडून याबाबत कुठल्याहीप्रकारची हालचाल करण्यात आली नाही.

नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी व शहरात पर्यटक मुक्कामी थांबावा यासाठी सहा वर्षांपूर्वी राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर ‘कलाग्राम’ उभारणीचे काम हाती घेतले; मात्र अद्याप कलाग्राम उभारणीच्या काम पुर्ण झालेले नाही.

अंतीम टप्प्यात येऊन प्रकल्प रखडला आहे. दीड ते दोन वर्षांपासून बांधकाम रखडले आहे. निधीअभावी काम ठप्प झाल्याने हा प्रकल्प पुर्णत्वास येऊ शकलेला नाही.

२०१४ साली कलाग्रामच्या बांधकामाला प्रारंभ झाला. दिल्लीच्या हाट बाजाराच्या धर्तीवर सुमारे पाच एकर जागेत कलाग्रामची उभारणी सुरू आहे. जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ साकारली जाणार होती.

चार कोटींच्या निधी पाण्यात जाण्याची भीती

‘कलाग्राम’च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १२ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्राकडून सुमारे चार कोटी रुपयांचा निधीही सुरूवातीला उपलब्ध करून दिला गेला; मात्र योजना बंद पडल्याचे सांगून उर्वरित निधी पुरविला गेला नाही.

परिणामी ‘कलाग्राम’ला लागलेले ग्रहण सुटले नाही. यामुळे उर्वरित कामासाठी जोपर्यंत निधी राज्याच्या पर्यटन विभागाक डून येत नाही, तोपर्र्यंत ग्रहण सुटणार नाही. राज्याने निधी पुरविला नाही तर चार कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

एकीककडे पर्यटनाच्या विकासासाठी इगतपुरी तालुक्यात आयुर्वेदिक वेलनेस हब, गंगापूर धरणाच्या शिवारात ग्रेप पार्क सारखे प्रकल्प सुरु केले असताना दुसरीकडे पाच एकर जागेत सुमारे चार कोटी रुपयांचा निधी खर्च करुन बांधण्यात आलेल्या कलाग्रामच्या वास्तू भग्नावस्थेत जाण्याची चिन्हे दिसत आहे.

निधी अभावी हा प्रकल्प पुर्णत्वास येता येता संपुष्टात जातो की काय, अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यात चोरट्यांनी येथील बरेचशे सामना लंपास केले आहे.