मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी नव्हे तर उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून नवीन तीन कृषी कायदे मंजूर केले आहेत. शेतकर्यांची अडवणूक करत कवडीमोल किंमतीत विकत घेतला जाणारा शेतमाल नंतर हे उद्योगपती दामदुप्पट भावाने विकून आपल्या तुंबड्या भरतील. त्यामुळे शेतकरी व ग्राहकांची लुट करणारे हे काळे कायदे रद्द झाल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा निर्धार शेतकरी व संविधान मानणार्या जनतेने केला असल्याची घणाघाती टिका करत माजी आ. जे.पी. गावीत यांनी जनविरोधी असलेल्या कृषि कायद्यांची माहिती जनतेस व्हावी यासाठी नाशिक ते दिल्ली किसान संघर्ष संवाद यात्रा काढण्यात आल्याचे येथे बोलतांना स्पष्ट केले.

केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषि कायद्यांविरोधात लढा देण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी काढण्यात आलेल्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे आज मालेगावी उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. टेहरे फाट्यावरून संघर्ष यात्रेने शहरात प्रवेश केला.

म. गांधी पुतळ्याजवळ या यात्रेतील नेत्यांसह शेतकर्यांचे माजी आ. शेख रशीद, महापौर ताहेरा शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठनेते राजेंद्र भोसले, प्रसाद हिरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शिवसेनेचे उपमहापौर निलेश आहेर, कृउबा उपसभापती सुनिल देवरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, संजय दुसाने, शांताराम लाठर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, बसपाचे रमेश निकम, दिनेश ठाकरे, भिमा भडांगे आदी सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत केले. यावेळी कृषी कायदे रद्द करा, मोदी सरकारवर हल्ला बोल आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला होता.

यानंतर संवाद यात्रा संगमेश्वरमार्गे अल्लमा एकबाल पूल, चंदनपुरी गेट, मुशावरत चौक, मोहंमद अलीरोड, जुना आग्रारोडमार्गे फिरविण्यात आली. मुशावरत चौकात संवाद यात्रेचे एमआयएमचे आ. मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, माजी स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेज आदी नेत्यांनी तर जनता दलातर्फे सरचिटणीस मुस्तकीम डिग्नेटी व कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.

शहरात ठिकठिकाणी विविध पक्ष-संघटनांतर्फे यात्रेचे स्वागत केले गेले. यात्रा एटीटी हायस्कुल जवळ येताच तिचे रूपांतर सभेत झाले. प्रास्ताविक राष्ट्रवादी नेते राजेंद्र भोसले यांनी केले. कृषि क्षेत्राला उद्योगपतींच्या दावणीला बांधण्याचे काम मोदी सरकारतर्फे केले जात असल्यानेच शेतकरी संतप्त होवून रस्त्यावर बसले आहे. या लढाईत अन्नदात्या शेतकर्यांच्या बरोबर देशातील संविधान मानणारी जनतासुध्दा आहे. हे दाखवून देण्यासाठीच संवाद यात्रेचे आज मालेगावकरांतर्फे अभुतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आल्याची माहिती भोसले यांनी यावेळी बोलतांना दिली.

यावेळी मार्गदर्शन करतांना माजी आ. जे.पी. गावीत यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. शेतकर्यांबरोबर जनता विरोधी असलेले हे काळे कायदे सरकारला मागे घेण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी किसान सभेचे नेते अशोक ढवळे, डॉ. डी.एल. कराड, महापौर ताहेरा शेख, माजी आ. आसिफ शेख, प्रसाद हिरे, उपमहापौर निलेश आहेर, विरोधी पक्षनेत्या शानेहिंद निहाल अहमद आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले.

यात्रेस देणगी

किसान संघर्ष संवाद यात्रेत गोरगरीब शेतकरी सहभागी झाले आहेत. दिल्लीपर्यंत पोहचतांना त्यांना चहा व जेवणाची सोय व्हावी यासाठी माजी आ. शेख रशीद यांनी 25 हजार रूपयांची देणगी दिली.