Photo Gallery : विकेंड लॉकडाऊन कागदावरच; बाजारपेठेत चोरी चुपके व्यवहार सुरूच

Photo Gallery : विकेंड लॉकडाऊन कागदावरच; बाजारपेठेत चोरी चुपके व्यवहार सुरूच

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन (Weekend Lock down) सुरु ठेवण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवार यादिवशी अत्यावश्यक आस्थापना वगळता सर्वत्र व्यवहार बंद करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने (District Administration) दिल्या आहेत. मात्र, नाशिककरांना करोनाची भीती नसल्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अनेक भागात दुकानदारांनी प्रशासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवत दुकानाचे शटर अर्धवट उघडे ठेवत चोरी चुपके व्यवहार सुरु केलेले दिसून आले....

नुकत्याच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटे संदर्भात वैद्यकीय ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करण्याचे सांगितले. कोरोनाबधितांची आकडेवारीचा अंदाज घेऊन निर्बंध जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते; मात्र, नागरिक तसेच काही व्यावसायिकांनी आदेश धुडकावत बाजारपेठेत गर्दी केली.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शालिमार, मेनरोड, महात्मा गांधी मार्ग, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, गंगापूर रोड आदी ठिकाणी अर्धे शटर उघडे ठेवून व्यवहार होत होते. बाजारपेठेत ठिकठिकाणी पोलीस होते; मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याने याबाबत पोलिसांची देखील भूमिका संशयाची असल्याचे चित्र होते.

रेडक्रॉस सिग्नल तसेच महात्मा गांधी रोड, मेन रोड आदी भागांमध्ये अर्धे शटर लावून व्यवहार सुरू होते. बाजारपेठ असल्या कारणाने या भागात पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र, पोलिस असून देखील हा प्रकार घडत असला तरी कोणतीही कारवाई यावेळी करण्यात आली नाही.

गंगापूर रोड या भागात देखील अर्धे शटर उघडे ठेवून कामकाज सुरू होते. पंडित कॉलनीमध्ये दुकानांमसमोर नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले.

विकेंड लॉकडाऊन हा नक्की कोणासाठी आहे. नागरिकांना या परिस्थितीचे गांभीर्य कसे नाही? व्यावसायिकांनी देखील थोडा अजून संयम राखणे अपेक्षित नाही का? असे प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com