गोदावरी नदीपात्राला पाणवेलींचा विळखा

प्रशासनाची चालढकल; नागरिक हैराण
गोदावरी नदीपात्राला पाणवेलींचा विळखा

निफाड । प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदीपात्राला पाणवेलींचा विळखा पडल्याने या पाणवेली काढण्याबाबत पाटबंधारे विभागाकडे अनेक वेळा मागणी करूनदेखील त्या काढण्याची कार्यवाही केली जात नसल्याने या पाणवेलींची दुर्गंधी गावात पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाने सायखेडा पुलावरील पाणवेली काढल्या असल्या तरी पुन्हा त्याच ठिकाणी पाणवेलींनी बस्तान बसवले आहे. तर करंजगाव येथील पुलाजवळील पाणवेली अद्यापपर्यंत काढण्यात न आल्याने नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावासह दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांपासून सायखेडा, करंजगाव व नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणवेली साठल्या असून त्या काढण्याची कार्यवाही पाटबंधारे विभागाकडून होत नाही. करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके यांनी पाणवेली काढण्याबाबत उपोषणाचा इशारा दिला होता.

साहजिकच पाटबंधारे विभागाने सायखेडा येथील पुलाजवळील पाणवेली काढण्याची तत्परता दर्शवली. परंतु संंपूर्ण गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढल्या असत्या तर पुन्हा या ठिकाणी नदीपात्रात पाणवेली दिसल्या नसत्या. परंतु सायखेडा नदीपात्रात वरवरची कार्यवाही तर करंजगाव नदीपात्र व नांदूरमध्यमेश्वर धरणाकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणवेलींनी बस्तान बसवले आहे.

या पाणवेलींमुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले असून त्याची दुर्गंधी परिसरातील गावात फैलावून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच पाणवेलींमुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाणवेलींमुळे पाणी दूषित झाल्याने जनावरेदेखील गोदावरीचे पाणी पित नाहीत. गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असतानाही पाटबंधारे विभाग मात्र त्याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करत आहे.

गोदापात्रात नाशिक शहराचे सांडपाणी सोडले जात असल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र गोदावरीच्या या पाण्यावर अनेक गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे मानवता धर्म जोपासत नाशिक मनपाने सांडपाणी गोदावरीत न सोडता अन्यत्र विल्हेवाट लावावी. तसेच पाटबंधारे विभागाने करंजगावसह सायखेडा व नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाणवेली काढून हा परिसर दुर्गंधीमुक्त करावा, अशी मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com