पंचवटी | वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत कमालीची वाढ होत असल्याने, जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आठवडे बाजार अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला...

गोदाघाटावरील दर आठ दिवसांनी भरणाऱ्या आठवडे बाजारात बुधवारी (दि.१०) शुकशुकाट पाहायला मिळाला. काही विक्रेते आसपासच्या परिसरात आणलेला माल विक्री करीत असल्याचा अपवाद वगळता दिवसभर गोदाघाट परिसर विक्रेत्यांविना सुना सुना भासत होता.

गोदा घाटावरील प्रसिध्द बुधवाराच्या आठवडे बाजारात शेकडो विक्रेते विविध वस्तूंची विक्री करीत असतात. जिल्हाभरातून हे विक्रेते या आठवडे बाजारात वस्तू विक्रीसाठी आणतात. हा आठवडे बाजार गोदा घाटावरील म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, रोकडोबा पटांगण, गणेशवाडी रस्ता यासह आदी भागात मोठ्या स्वरूपात विस्तारलेला आहे.

या बाजारात विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण नसल्याने, विक्रेत्यांसह ग्राहकांनी कोरोना काळातील सर्व नियम धाब्यावर बसवले असल्याचे समोर आले आहे.

अलीकडच्या काळात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, वाढत्या कोरोना रुग्णांवर आळा बसावा यासाठी प्रशासनाने आठवडे बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि.१०) गोदाघाट परिसरात मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने सकाळच्या सुमारास याठिकाणी विक्रेत्यांना आपले दुकान लावण्यासाठी मनाई केली.

तसेच विभागीय अधिकारी विवेक धांडे स्वतः वाहनातून लाऊडस्पीकर द्वारे विक्रेत्यांना आठवडे बाजार भरविण्यास मनाई असून, यापुढे काही दिवस बाजार बंद असल्याचे आवाहन करीत होते. यामुळे या संपूर्ण परिसरात दिवसभर शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळाले.