नाशिक | प्रतिनिधी

सर्वत्र करोनाची भिती असल्याच्या काळात आरोग्य विभागातून जिल्हा रूग्णालयात कार्यरत आम्ही सर्व डॉक्टर, कर्मचारी पहिल्या फळीत लढत होतो.अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून मी कार्यरत होतो. करोना रूग्णांची व्यवस्था, उपचार यासाठी आमच्या विभागातील डॉक्टर व कर्मचार्यांचे नियोजन याची जबाबदारी मी पार पाडत होतो. करोना योद्धा म्हणून काम करत असतानाच मला एप्रिल 2020 च्या शेवटच्या आठवड्यात करोनाची किरकोळ लक्षणे दिसून आली.

मला तत्काळ जिल्हा रूग्णालयातीलच करोना कक्षात दाखल करण्यात आले. त्याच वेळी आरोग्य विभागाचा होम क्वारंटाईनचा नियमही आला होता. मी स्वतः डॉक्टर असल्याने व स्वताची काळजी घेऊ शकत असल्याने मी होम क्वारंटाईनची पहिली परवानगी मागीतली. यासाठी खूप आटापीटा करावा लागला. याबरोबरच आपण राहत असलेल्या सोसायटीतील नागरिकांनी तीव्र विरोध करत जवळ जवळ वाळीत टाकले.

यामुळे माझ्यासह सर्व कुटुंब फार मोठ्या मानसिक तणावाखाली होते. अखेर आरोग्य उपसंचालक, पत्रकार व इतरांच्या सहकार्याने अखेर मला 8 मे रोजी होम क्वारंटाईन करण्यात आले परंतु एक करोना वॉरियर असताना जी वागणूक मिळाली याच्या यातना कायम मनात राहिल्या आहेत. यामुळे करोना होणे किती भयानक असते याच्या अनुभवातून आम्ही गेलो आहोत. ही वेळ आपणावर येऊ नये म्हणून प्रत्येकाने करोनाचे सर्व नियम पाळत स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे. आपला मास्कच आपली लस आहे. म्हणून मास्क घाला, करोना टाळा..

संजय गांगुर्डे, वैद्यकिय अधिकारी, जिल्हा शासकीय रूग्णालय